पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाचा पाणीप्रश्न मार्गी


कर्जत :- तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाला पिण्यासाठी व शेतीसाठी शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. जलसंपदा विभागाच्या कृष्णा खोरे विकास महामंडळाने कृषि महाविद्यालयासाठी करमाळा तालुक्यातील मांगी तलावातून पाणी आरक्षण मंजुर केले आहे.

जामखेड तालुक्यातील शेती शिक्षणासाठी महत्त्वाचे असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाच्या स्रोत बदलाच्या मागणीनुसार मांगी मध्यम प्रकल्पातून सिंचन व पिण्यासाठी पाणी आरक्षणास शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे कृषी महाविद्यालयातील
शैक्षणिक, प्रात्यक्षिक शेती तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे. हळगाव कृषि महाविद्यालयासाठी सीना नदीवरील निमगाव गांगर्डे जलाशयातून पाणी आरक्षणाचा प्रस्ताव यापूर्वी मंजूर करण्यात आला होता. मात्र तो प्रस्ताव रद्द करून, मांगी मध्यम प्रकल्पातून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सभापती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदा

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे १० डिसेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयानुसार कृष्णा खोरे महामंडळाने ९ जानेवारी २०२६ रोजी पाणी आरक्षण मंजुरीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार हळगाव कृषि महाविद्यालयास मांगी तलावातून ०.४२७२ दलघमी पाण्याचे
आरक्षण मंजुर करण्यात आले आहे. कृषी शिक्षणासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून, हळगांव कृषी महाविद्यालयाच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे. या निर्णयामुळे कृषी महाविद्यालयातील प्रयोगशील शेती अधिक प्रभावी होणार, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचे प्रशिक्षण मिळणार, पाण्याअभावी रखडलेली कामे मार्गी लागणार, ग्रामीण भागातील शेतकी संशोधनाला बळ मिळणार आहे…




