शेतकऱ्यांचा लढवय्या उदयसिंग राजपूत; भाजपा किसान मोर्चा तालुका सरचिटणीसपदी निवड..

कर्जत प्रतिनिधी – विधान परिषदेचे सभापती नामदार रामजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष अनिल गदादे यांनी कर्जत तालुक्यातील भारतीय जनता पार्टीची नवी कार्यकारिणी दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केली.
या कार्यकारिणीत उदयसिंग राजपूत यांची भाजपा किसान मोर्चा तालुका सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.राजपूत हे रामजी शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि कार्यकर्त्यांच्या मनातील नेते म्हणून ओळखले जातात.

राजपूत यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक, अध्यात्मिक आणि मानवतावादी विचारांचे धनी आहेत. त्यांना अध्यात्माची विशेष आवड असून, ते नियमितपणे धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांत सहभागी होत असतात. पायी वारी करणे हा त्यांचा आवडता छंद आहे.
उदयसिंग राजपूत हे व्यसनमुक्ती अभियानाचे सक्रीय कार्यकर्ते असून, समाजात नशामुक्त जीवनशैली रुजविण्यासाठी ते सातत्याने जनजागृती करत असतात. शेतकऱ्यांच्या हक्कांसोबतच त्यांनी भटके, विमुक्त आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांवरही काम केले आहे.शेतकऱ्यांचा विज, पाणी आणि ऊस दर प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आंदोलनांचे नेतृत्व केले आहे.
“गोरगरिबांच्या सेवेसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करणे हेच माझे ध्येय आहे. नामदार रामजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी पक्षविस्तार आणि शेतकरी कल्याणासाठी कायमस्वरूपी कटिबद्ध राहीन,” असा निर्धार उदयसिंग राजपूत यांनी व्यक्त केला.
त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने दाखविलेला विश्वास ही शेतकरी वर्गाच्या नेतृत्वाला मिळालेली खरी मान्यता आहे, असे स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे.
या निवडीबद्दल तालुक्यातील ज्येष्ठ नेते अंबादास पिसाळ, काकासाहेब तापकीर, कैलास शेवाळे, प्रवीण घुले, अशोक खेडकर, दादासाहेब सोनमाळी, बापूसाहेब शेळके, शेखर खरमरे, सुनील यादव आणि अन्य वरिष्ठ नेत्यांनी राजपूत यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
कर्जत तालुक्यातील नव्या कार्यकारिणीमुळे पक्षात नवचैतन्य संचारले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या “राजपूत शैलीच्या लढाऊ नेतृत्वाला” तालुक्यात नवे बळ मिळाले आहे.




