शिवस्मित दूध संकलन व शीतकरण केंद्रात दिवाळी बोनस वाटप सोहळा उत्साहात…
पहिल्या पाच मानाच्या दूध उत्पादकांचा फेटे बांधून गौरव


कर्जत प्रतिनिधी :- शिवस्मित दूध संकलन व शीतकरण केंद्राच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्व दूध उत्पादक सभासदांना बोनस वाटपाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. नारायणजी जगताप (चेअरमन, जगदंबा दूध डेअरी व यशोमय्या पतसंस्था, राशीन), तसेच मा. श्री. बळीराम अण्णा यादव (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत व शिवसेना प्रमुख, कर्जत तालुका) हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. पोपटराव पवार (सरपंच, घालवडी) यांनी भूषविले. मा. श्री. उमेश आबा जगताप (माजी सरपंच, घालवडी) यांचीही या वेळी प्रमुख उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांच्या हस्ते दूध उत्पादक सभासदांना दिवाळी बोनसचे वितरण करण्यात आले.

या सोहळ्यात शिवस्मित दूध डेअरीतून पहिल्या मानाचे पाच उत्कृष्ट दूध उत्पादक सभासदांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला. ते पुढीलप्रमाणे —
1. बाळासाहेब मोहन सुपेकर 2. उमेश देविदास जगताप 3. वाल्मीक चांगदेव पवार 4. नितीन राजू सुपेकर 5. पांडुरंग मारुती सुपेकर
आपल्या मनोगतात मा. नारायणजी जगताप म्हणाले की, “दूध संकलन हा केवळ व्यवसाय नसून तो शेतकऱ्यांच्या आयुष्याशी थेट निगडित आहे. दिवाळी सारख्या पवित्र सणानिमित्त शेतकरी बांधवांना आर्थिक आधार मिळावा म्हणून बोनस देण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा आणि आदर्शवत उपक्रम आहे.”

मा. बळीराम अण्णा यादव यांनी शिवस्मित दूध डेअरीचे चेअरमन मा. गोकुळ पवार यांचे अभिनंदन करताना म्हटले की, “डेअरीने सर्व शेतकऱ्यांना सर्वोत्तम दूध सुविधा देण्यासोबतच बेसळमुक्त व उच्च प्रतीचे दूध उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिक प्रयत्न करावेत.”
या निर्णयामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी केंद्राचे आभार मानले. अनेक सभासदांनी येत्या काळात अधिकाधिक दूध संकलन करून केंद्राच्या विकासात आपला सक्रिय वाटा उचलण्याचा निर्धार व्यक्त केला.
शेवटी शिवस्मित दूध डेअरीचे चेअरमन मा. गोकुळ पवार म्हणाले की, “शेतकरी बांधवांच्या सातत्यपूर्ण परिश्रमामुळे आणि सहकार्यामुळे केंद्राने आज प्रगतीचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. दूध उत्पादक हेच आमचे खरे बळ आहेत. त्यांच्या योगदानाची कदर म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी बोनस वाटप करण्यात आले असून, भविष्यातही शेतकऱ्यांना सर्वोत्तम दर आणि उत्कृष्ट सुविधा देण्याची ग्वाही आम्ही देतो.”



