बाळासाहेब तापकीर यांची जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी निवड.

समृद्ध कर्जत : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमन पदी कर्जतचे संचालक बाळासाहेब तापकीर यांची निवड झाली. आज झालेल्या मतदान प्रक्रियेत तापकीर यांना बारा मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाऊराव राहिंज यांना आठ मते प्राप्त झाली. एक मतपत्रिका कोरी टाकण्यात आली.
या निवडीनंतर बोलताना श्री. तापकीर म्हणाले, “श्री बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली 2022 साली जिल्ह्यातील सर्वसामान्य सभासदांनी जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाला पात्र राहून बँकेचा कारभार पारदर्शक, काटकसरीचा व सभासदहिताचा ठेवला जाईल.”
गेल्या काही महिन्यांत शिक्षक बँकेत राज्य पातळीवरून हस्तक्षेप झाला होता, याकडे लक्ष वेधत तापकीर म्हणाले की, “सभासदांनी परिस्थितीची अचूक जाण ठेवून योग्य निर्णय घेतला. ही सत्ता आमच्या कार्यतत्परतेवर व पारदर्शक कारभारावर आधारित आहे.”
या वेळी गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे प्रमुख श्री बापूसाहेब तांबे यांनी सांगितले की, “आगामी दोन वर्षांत शिक्षक बँक ही राज्यात अग्रगण्य ठरेल, अशी आमची भूमिका असून सभासदांचे हित हेच आमचे ध्येय राहील.”
या निवडीचे शिल्पकार म्हणून अर्जुनराव शिरसाठ, बाबासाहेब खरात, विद्याताई आढाव यांचे विशेष योगदान लाभले. सूत्रसंचालन श्री प्रकाश नांगरे यांनी केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील अनेक शिक्षक नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.