जि. प. केंद्र शाळा शिंदेच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत कामगिरी
गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाचे फळ : ३१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत मिळवले स्थान

कर्जत : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या विविध राज्यस्तरीय व विभागीय स्पर्धा परीक्षांमध्ये जि. प. केंद्र शाळा शिंदे येथील विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश मिळवत गावाचे व शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. Iam Winner, मिशन आरंभ, मंथन प्रज्ञाशोध आणि लक्षवेध सामान्य ज्ञान या प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षांमध्ये एकूण ३१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावले आहे.
Iam Winner या स्पर्धा परीक्षेमध्ये शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले. मिशन आरंभ परीक्षेत दोन विद्यार्थ्यांनी आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली. विशेष म्हणजे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत तब्बल १० विद्यार्थ्यांनी, तर लक्षवेध सामान्य ज्ञान स्पर्धेत १६ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादी गाठत गावाचे नाव उज्वल केले आहे.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. हनुमंत राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या यशामागे वर्गशिक्षकांचे सातत्याने केलेले मार्गदर्शन आणि अभ्यासपद्धती याचा मोठा वाटा आहे. योग्य दिशा आणि प्रेरणा मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील मोठे यश संपादन करू शकतात, याचा हा उत्कृष्ट नमुना आहे.”
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल वर्गशिक्षक श्री. भैरू घालमे, श्रीमती स्मिता रसाळ, श्रीमती राणी राऊत तसेच मुख्याध्यापक श्री. विकास पवार यांचे ग्रामस्थांकडून विशेष अभिनंदन करण्यात आले.
मुख्याध्यापक श्री. विकास पवार यांनी सांगितले “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची आणि जिज्ञासेची प्रचंड ताकद आहे. आम्ही शिक्षक म्हणून केवळ त्यांच्या क्षमतेला योग्य दिशा देण्याचे काम केले. स्पर्धा परीक्षांचे महत्त्व समजावून देत आम्ही त्यांना नियमित सराव,
मार्गदर्शन सत्रं, वाचन संस्कृती आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले. हे यश संपूर्ण शाळेचे, गावकऱ्यांचे आणि विशेषतः मेहनती विद्यार्थ्यांचे आहे. पुढील काळातही ही प्रगती अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”