ब्रेकिंग
कर्जत तालुक्यात तीव्र पाणीटंचाई : उन्हाळी आवर्तनासाठी शिंदे-विखेंचा पुढाकार – काकासाहेब धांडे

Samrudhakarjat
4
0
3
1
2
3
समृद्ध कर्जत : – सध्या कर्जत तालुक्यासह अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी आणि जनावरांसाठी पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. मागील वर्षी झालेला अपुरा पाऊस आणि यंदाचा तीव्र उन्हाळा यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. अशा वेळी कुकडी धरणाचे आवर्तन लवकरात लवकर व्हावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.
या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला असून, लवकरच धरणातून उन्हाळी आवर्तन सुरू होणार असल्याची माहिती कुकडी प्रकल्प सल्लागार समितीचे सदस्य काकासाहेब धांडे यांनी दिली.
काकासाहेब धांडे म्हणाले, “सध्या कर्जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरांसाठी पाणी नाही, नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि शेतीसाठीही ताण आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सभापती राम शिंदे यांनी धरणातील पाणी परिस्थितीचा आढावा घेत लवकरच आवर्तन सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता, जनहिताला प्राधान्य दिले जाईल. काही दिवसांत आवर्तनाची तारीख निश्चित होईल.” दरम्यान, शेतकरी वर्ग, स्थानिक प्रशासन आणि जनतेनेही धरणातील पाण्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. उन्हाळ्याचा कडाका वाढत असताना येणारे हे आवर्तन कर्जतकरांसाठी दिलासा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.