खासदार निलेश लंके यांनी विज्ञान-गणित प्रदर्शनाला दिली प्रेरणादायी भेट

(कर्जत प्रतिनिधी) कर्जत तालुक्यातील कोटा कोटा मेंटॉर्स प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 2 जानेवारी 2025 ते 4 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित 52 व्या विज्ञान-गणित प्रदर्शनाला खासदार निलेश लंके यांनी भेट दिली.
या प्रदर्शनात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या सृजनशीलतेचा प्रत्यय देत विज्ञान आणि गणित क्षेत्रातील संशोधन, प्रयोग, व प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला पालकवर्गासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
खासदार निलेश लंके यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे कौतुक करत, विज्ञान व गणिताच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “विद्यार्थ्यांनी सृजनशील व नाविन्यपूर्ण कल्पना मांडल्यास, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल,” असे ते म्हणाले.
विद्यालयाचे प्राचार्य, केशव आजबे व शिक्षक आयोजकांनी खासदारांचे स्वागत करत या प्रदर्शनाला यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.
या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळत असून शैक्षणिक क्षेत्रासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.