सावित्रीच्या लेकीने व्यवस्थेला सामोरे जायला हवे… डॉ. वंदना महाजन
सामाजिक समतेचे स्वप्न प्रत्यक्षात आणता आले पाहिजे ...डॉ. वंदना महाजन

(कर्जत प्रतिनिधी) :- भारतातील स्त्रियांच्या जीवनात नवपरिवर्तन करणाऱ्या, स्री हक्काच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दादा पाटील महाविद्यालय, कर्जत जि. अहमदनगर येथील मराठी विभागाच्या वतीने तिसऱ्या स्रीशिक्षिका साहित्य संमेलनाचे आयोजन शुक्रवार दि. ३ जानेवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात करण्यात आले होते.
सकाळी ८ ते ९ या कालावधीमध्ये कर्जत शहरातून ग्रंथदिंडी व शोभायात्रा काढण्यात आली. या ग्रंथदिंडीमध्ये संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष, निमंत्रित लेखिका, कवयित्री व महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झालेला होता. याप्रसंगी दादा पाटील महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या स्त्री समाजसुधारकांच्या वेशभूषा परिधान करून ग्रंथदिंडी मध्ये सहभागी झालेल्या होत्या.
या संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके यांनी स्वागतपर भाषणात उपस्थितांचे स्वागत करून स्त्रीशिक्षिका साहित्य संमेलन घेण्यामागील उद्देश स्त्रीशिक्षिकांसमोर मांडला. मनुस्मृतीमध्ये स्त्रीला दुय्यम स्थान मानले गेले आहे. स्त्री स्वतंत्र नाही, असे म्हटले गेले आहे. परंतु स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वावर अनेक क्षेत्रांमध्ये प्रभाव निर्माण करून आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. स्त्रीशिक्षिका साहित्य संमेलनाचा हा प्रयोग प्रथमच कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयांमध्ये सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
याप्रसंगी या संमेलनाचे निमंत्रक आमदार रोहितदादा पवार यांनी आपल्या उदघाटनपर भाषणामध्ये सांगितले की, क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे विचार आजही समाजापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले महिलांनी वाचले पाहिजेत. सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन स्त्री शिक्षणाला विरोध करणाऱ्यांचे शेण, दगड-गोटे झेलत संघर्ष ठेवला. भविष्यासाठी हा संघर्ष किती गरजेचा होता हे त्यांनी जाणले होते. आपली पहिली गुरु ही आई असते. तिच्याकडूनच खऱ्या अर्थाने संस्कार आपल्यावरती घडतात. महापुरुषांच्या जयंतीचा जागर अशा पद्धतीच्या संमेलनातून पुढे जाणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. अलीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान पुढे जायला लागले आहे. कल्चरल पॉलिटिक्स घातक ठरत आहे. चुकीच्या गोष्टी दाखविण्यापेक्षा महामानवांवरील चित्रपट दाखविणे गरजेचे आहे. लेखकाने लिहिलेले साहित्य कृतीत आणले तर परिवर्तन अटळ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तिसऱ्या स्त्रीशिक्षिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. वंदना महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले की, लेखक समाजासाठी लिहीत असतो. तळागाळातील लोकांचे जगणे मांडणारे लेखन अधिकाधिक यायला हवे. मानव मुक्तीचा दृष्टिकोन समोर ठेवूनच लेखन केले गेले पाहिजे. महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या प्रश्नांअगोदर धर्मचिकित्सा केलेली होती. यातून त्यांना स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांच्या शोषणाची पातळी मांडता आली. रोजगारभिमुखतेपेक्षा चांगला माणूस घडवणे हे गरजेचे असल्याचे महात्मा फुले मानत. शोषणाला कारण ठरणारी व्यवस्था कोणती आहे हे शोधले पाहिजे. अनेक धर्मांचे पालन करणारे कुटुंब घरात असावे. जे कुटुंबामध्ये घडत असते तेच देशांमध्ये घडत असते. व्यवस्थेची चिकित्सा करणारे बहुजन पुढे यावेत ही कर्मवीर भाऊराव पाटलांची धारणा होती. सांस्कृतिक वर्चस्व निर्माण केले जात आहे याकरिता पद्धती चिकित्सा करायला हवी. कोविड काळात शिक्षणाचे खूप मोठे नुकसान झाले आहे ते दूर करणे काळाची गरज बनली आहे. ज्ञानपद्धतीचीही चिकित्सा व्हायला हवी. सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, बहिणाबाई चौधरी यांचे लेखन महत्वपूर्ण आहे. बहुजन समाजाचा सलोखा खालावतो आहे. शिक्षक, विचारवंतांनी सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी आता प्रयत्न करणे गरजेचे आहे. बहुजन समाजातील घरात एक सेन्सॉर बोर्ड तयार होत असल्याने अनेक महिलांना धाडसाने लिहिता येत नाही. अशा महिलांनी मी सावित्रीची लेक आहे हे समजून व्यवस्थेला सामोरे गेले पाहिजे असे प्रतिपादन केले.
उद्घाटन सत्राकरिता जामखेडचे शिक्षणाधिकारी कैलास खैरे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अंबादास पिसाळ, दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेंद्रकाका निंबाळकर, बप्पाजी धांडे, दलित मित्र दादा पाटील यांच्या स्नुषा निर्मलाताई पाटील, विजयसिंह गोलेकर, कर्जत डॉक्टर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश तोरडमल, पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश दिवटे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, खजिनदार प्रा. प्रकाश धांडे, तात्यासाहेब ढेरे संतोष निंबाळकर आदि मान्यवर उपस्थित होते.
या संमेलनामध्ये महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शाखेतील जवळपास नऊशेपेक्षा अधिक स्री-शिक्षिकांनी सहभाग नोंदवला होता. या संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल म्हस्के यांनी तर आभार प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी मानले.