‘एकविसावे शतक आणि महिला सक्षमीकरण’ या विषयावरील परिसंवाद संपन्न

कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये मराठी विभागाच्या वतीने ‘तिसरे स्त्रीशिक्षिका साहित्य संमेलन’ महाविद्यालयाच्या शारदाबाई फुले सभागृहात शुक्रवार दि. ३ जानेवारी २०२५ रोजी सावित्रीबाई फुले जयंतीदिनी आयोजित करण्यात आले होते.
‘एकविसावे शतक आणि महिला सक्षमीकरण’ या विषयावरील परिसंवाद दुपारच्या सत्रात संपन्न झाला. या परिसंवादाच्या सत्र अध्यक्षा रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने होत्या. तर साधनव्यक्ती म्हणून सोलापूर येथील डॉ. कविता मुरूमकर, पुणे येथील डॉ. निशा भंडारे, श्रीरामपूर येथील श्रीमती नाजिया शेख यांनी आपले विचार व्यक्त केले.
डॉ. कविता मुरूमकर यांनी याप्रसंगी सांगितले की, महिलांना डिजिटल साक्षरता व रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. स्त्रिया सर्वांगीण विकास होण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणात लवचिक अभ्यासक्रम व मातृभाषेला महत्त्व दिले गेले आहे. कोणतीही मुलगी शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
डॉ. निशा भंडारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजची महिला शिक्षण घेऊन सुद्धा व्रत वैकल्यात अडकल्या आहेत त्यांना बदलण्याचे काम स्त्रीशिक्षिकांनी केले पाहिजे. स्त्री गर्भातच सुरक्षित नाही तर समाजात कशी सुरक्षित राहील. विद्यार्थ्यांना आजचे ज्ञान गुगलवर पाहिजे असते. स्त्री पुरुष समानता असण्यासाठी तशी मानसिकता बदलायला हवी. महिला सबला आहे तिला अबला मानू नका, ती सक्षमच आहे. सावित्रीबाई फुले यांनी ज्योतीराव यांचा विचार पुढे घेऊन गेल्या.
शेख नाजिया यांनी नवीन शैक्षणिक धोरणावर बोलताना सांगितले की, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या सोबत राहून शिक्षण घेतले व त्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका बनल्या. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी खर्च केले. वंचित, आर्थिक व कमकुवत समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. वैज्ञानिक विचार रुजवायला हवा असे त्यांनी नमूद केले.
सत्र अध्यक्षा मीनाताई जगधने यांनी सांगितले की, स्त्रियांना देवी म्हणून भिंतीच्या चौकटीत बसवणे बंद व्हायला हवे. आज महिला अनेक क्षेत्रात काम करत आहेत. स्त्री कमकुवत नाही तर त्या सक्षम आहेत. मुलींपासून महिलांपर्यंत सुरक्षिततेचा प्रश्न अजूनही जिवंत आहे. रूढीवाद, लिंगभेद अजूनही आहे. समाजामध्ये सकारात्मक बदलाची आवश्यकता आहे.
या परिसंवादाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी यांनी तर आभार प्रा. सुभाष कोरडे यांनी मानले. या सत्राचे सूत्रसंवादक म्हणून अहिल्यानगर येथील डॉ. महेबूब सय्यद यांनी भूमिका सांभाळली.