दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूधाला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी युवक क्रांती दलाच्या वतीने निघणार कर्जत ते अहमदनगर टू व्हिलर रॅली

कर्जत (प्रतिनिधी) :- अनेक दिवसांपासून दूधाचे खरेदी दर मोठ्या प्रमाणावर पाडले जात आहेत. यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर युवक क्रांती दलाच्या वतीने येत्या शुक्रवारी (दि. २४) किटली मार्च काढण्यात येणार आहे. कर्जत शहरातील विजय स्तंभ येथून ही रॅली निघणार आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन युवक क्रांती दल, कर्जत तालुका यांच्याकडून करण्यात आले आहे.
दूध दर वाढीच्या संदर्भात मंगळवारी दुग्धविकास मंत्र्यांनी दूध संघ, दूध कंपन्या व शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली. सरकारने काढलेला ३४ रुपयांचा दूध दराचा आदेश दूध कंपन्यांनी धुडकावून लावला आहे. त्यामुळे हा प्रश्न जैसे थे आहे. या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी ‘युक्रांद’च्या वतीने रॅली काढण्यात येणार आहे.
कर्जतहून मिरजगाव – मांदळीमार्गे ही रॅली अहमदनगर येथील पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री यांचे कार्यालय येथे नेण्यात येणार आहे. दूध दरातून दूध उत्पादकांची होणारी रोजची लूट, पाडलेले दर आणि या संबंधीच्या दूध उत्पादकांच्या मागण्या निवेदन देऊन मांडल्या जाणार आहेत. तेथील अधिकाऱ्यांना दूधाची किटली भेट देवून शेतकरी पाडलेल्या दूध दराचा निषेध व्यक्त करणार आहेत.