जीवे मारण्याची धमकी देत लोखंडी रॉडने हल्ल्याचा प्रयत्न; कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल
लोखंडी रॉडने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न; चौघांसह अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल


कर्जत (प्रतिनिधी) : – कर्जत शहरातील नवीन पेठ परिसरात पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना समोर आली आहे. केदार प्रविण ढोकरीकर (वय २६, रा. हनुमान गल्ली, कर्जत) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी अमित राजेंद्र माने, संकेत राजेंद्र माने, राजेंद्र माने तसेच चार ते पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी केदार ढोकरीकर यांच्या म्हणण्यानुसार, पैशांच्या व्यवहारावरून अमित माने त्यांना फोन करून पैशांची मागणी केली होती. यानंतर हा वाद वाढत गेला. २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नवीन पेठ येथील वीरा वन ग्रॅम ज्वेलर्स परिसरात फिर्यादीचे वडील प्रविण ढोकरीकर यांच्याशी पैशांच्या कारणावरून वाद झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, अमित माने याच्यासोबत संकेत माने व अन्य चार ते पाच जण तेथे आले. अमित माने याने हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या वडिलांच्या डोक्याच्या बाजूला जोरात मारून गंभीर दुखापत केल्याचा आरोप आहे. त्यानंतर संकेत माने याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तसेच त्याच्यासोबत आलेल्या व्यक्तींनीही फिर्यादीच्या वडिलांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
इतकेच नव्हे तर, “तुला जिवंत सोडणार नाही” असे म्हणत लोखंडी रॉडने जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. या घटनेनंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.

घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, वैद्यकीय अहवाल तसेच तक्रारीत नमूद केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. केवळ गुन्हा दाखल करून प्रकरण थंड बस्त्यात न पडता, आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
कायद्याचा धाक हा सर्वांसाठी समान असला पाहिजे. पैशांच्या वादाला हिंसक वळण देणाऱ्यांना कायद्याची ताकद दाखविण्याची हीच वेळ आहे. कर्जत पोलिस आता या प्रकरणात किती कठोर पाऊल उचलतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणात परस्पर विरोधात झालेल्या फिर्यादीत ढोकरीकर कुटुंबातील 2 व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टीप : वरील वृत्त हे पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीतील माहितीनुसार आहे. आरोपींवरील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी आहे.


