उपवर्गीकरणाच्या विरोधात कर्जत तालुक्यातील समस्त भीमसैनिकांचा एल्गार; २८ सप्टेंबरला ‘संविधान सन्मान जनआक्रोश मोर्चा’ आणि संविधान सन्मान सभेचे आयोजन


(कर्जत प्रतिनिधी) :- अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे संविधानाच्या मूळ आराखड्याला आणि सामाजिक ऐक्याला धक्का पोहोचल्याची भावना व्यक्त करत कर्जत तालुक्यातील समस्त भीमसैनिकांच्या वतीने ‘संविधान सन्मान जनआक्रोश मोर्चा’ व संविधान सन्मान सभेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. संविधानाच्या रक्षणासाठी आणि आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात घटनात्मक भूमिका मांडण्यासाठी हा मोर्चा येत्या सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता निघणार आहे.
या मोर्चासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
“हक्क कि लढाई मै निमंत्रण नहीं भेजे जाते, जिसका जमीर जिंदा है वो खुद चले आते है” आणि “संविधान के सन्मान मै, भिम सैनिक मैदान में” या ब्रीदवाक्यांसह उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी तालुक्यातील भीमसैनिक आक्रमक झाले आहेत. सोमवारी सकाळी ११:०० वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कर्जत येथून मोर्चाला सुरुवात होऊन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मेन रोड मार्गाने हा जनआक्रोश मोर्चा तहसील कार्यालय, कर्जत येथे धडकणार आहे.आणि त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात या मोर्चाचे रूपांतर एका भव्य ‘संविधान सन्मान सभेत’ होणार आहे.जिथे उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात सनदशीर मार्गाने निदर्शने करून तहसीलदार यांच्यामार्फत प्रशासनाला निवेदन सोपवले जाईल.

संविधानाने मागासवर्गीय समाजाला दिलेल्या आरक्षणात उपवर्गीकरण केल्यास अनुसूचित जातींमध्ये फूट पडण्याची आणि वंचित घटकांमधील सामाजिक बंधुभाव धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या अखंडित सामाजिक आरक्षणाच्या तत्त्वाला अबाधित ठेवणे आणि संविधानाचा सन्मान राखणे हीच खरी लोकशाहीची आहे, असे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे.

या संविधानीक हक्कांच्या लढ्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी तालुक्यातील सर्व स्वाभिमानी संविधानप्रेमी नागरिकांनी व भीमसैनिका सह माता- भगिनीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कर्जत तालुक्यातील समस्त भीमसैनिकांच्या वतीने अनुसुचीत जातीमधील सर्व 59 जातींना आवाहन करण्यात आले आहे.



