जन्मोजन्मी हाच पती मिळू दे…’ : वटपौर्णिमा सण राशीन येथे उत्साहात साजरा.


राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जाणारा ‘वटपौर्णिमा’ उत्सव कर्जत तालुक्यातील राशीन येथे अत्यंत उत्साहात, पारंपरिक पद्धतीने आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, तसेच जन्मोजन्मी हाच पती मिळावा या प्रार्थनेसह परिसरातील शेकडो सुवासिनींनी वडाच्या झाडाची पूजा केली.

आज सकाळपासूनच शहरातील विविध भागांतील वटवृक्षांजवळ महिलांची दर्शनासाठी आणि पूजेसाठी मोठी गर्दी दिसून आली. नवविवाहितांपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनीच पारंपरिक नऊवारी व साडी परिधान करून, पारंपरिक दागिने घालून नटून-थटून या पूजेत सहभाग घेतला होता.

महिलांनी वडाच्या झाडाला हळद-कुंकू वाहून, आंबा, फणस, जांभूळ यांसारखी हंगामी फळे अर्पण केली. त्यानंतर वडाच्या झाडाला सुती धागा गुंडाळून सात फेऱ्या मारत पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना केली. एकमेकींना ओवाळून आणि ‘वाण’ देऊन महिलांनी या सणाचा आनंद द्विगुणित केला.

यावर्षीच्या वटपौर्णिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अनेक महिला मंडळांनी आणि संस्थांनी ‘पर्यावरणपूरक वटपौर्णिमा’ साजरी केली. वडाच्या फांद्या तोडून आणून पूजा करण्याऐवजी, थेट जिवंत वटवृक्षाची पूजा करण्याला महिलांनी प्राधान्य दिले. वटपौर्णिमेचे अवचित्य साधत श्री जगदंबा देवी मंदिराच्या आवारात उत्कृष्ट मनमोहक रांगोळी सुहासिनी वटवृक्षाची पूजा करताना काढण्यात आली होती.




