श्री दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न…
शंभू ऑईल मिल आणि अमोल थोरात यांच्या सहकार्याने भाविकांसाठी महाप्रसाद


कर्जत : – कर्जत–कुळधरण रस्त्याजवळील पठाडे वस्ती परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्याचा भव्य व भक्तिमय उत्सव गुरुवार दि. ०४ डिसेंबर २०२५ रोजी अत्यंत श्रद्धा, भक्तीमय आणि उत्साहात पार पडला. ग्रामीण भागात दत्तजयंतीचे विशेष औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास परिसरातील नागरिक आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्सवाला अधिक उजाळा दिला.

या कार्यक्रमाचे प्रमुख स्थळ तुकाई मंदिराजवळील पठाडे वस्ती परिसर होता. कृषिरत्न नर्सरी मार्गे तसेच कर्जत-बर्गेवाडी रस्त्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणावर येत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. दिवसभर सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थितांच्या प्रतिसादातून दत्तभक्तीची झलक स्पष्टपणे जाणवत होती.
उत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे मुक्ताई महिला भजनी मंडळ, शहाजीनगर यांनी सायं. ५ ते ६ या वेळेत सादर केलेले
भक्तिगीत व भजनांचा कार्यक्रम. भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला. भजनानंतर पारंपरिक पद्धतीने फुले टाकण्याचा कार्यक्रम मोठ्या शिस्तबद्धतेने पार पडला.
यावेळी भजनी मंडळ यांचा सत्कार सदगुरू गोदड महाराज यांची प्रतिमा देऊन करण्यात आला.

कार्यक्रमाचा समारोप सायं. ६.३० ते ९.३० या वेळेत आयोजित महाप्रसादाने झाला. शंभू ऑईल मिल आणि श्री. अमोल थोरात यांच्या सहकार्याने भाविकांसाठी रुचकर आणि प्रेमपूर्वक दिल्या गेलेल्या महाप्रसादाचा शेकडो भक्तांनी लाभ घेतला. कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था स्थानिक ग्रामस्थांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केल्याने सोहळा निर्विघ्न व शांततेत संपन्न झाला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सवातील आकर्षक धार्मिक वातावरण, भाविकांची ओसंडून वहाणारी उपस्थिती आणि विविध कार्यक्रमांची भक्तिमय सादरीकरणे यामुळे श्री दत्त जन्मोत्सव सोहळा कर्जत परिसरात अत्यंत यशस्वी आणि उत्साहवर्धकपणे संपन्न झाला, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.



