शिवचरित्रात मी पणाला जागा नाही…प्रशांत देशमुख
स्वराज्य नावाच्या विचाराला जिवंत ठेवा....प्रशांत देशमुख

कर्जत (प्रतिनिधी) :- दादा पाटील महाविद्यालयात कर्मवीर जयंती सप्ताहनिमित्त महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात सांस्कृतिक विभागाच्या वतीने कर्मवीर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. ‘उठ युवका तू जागा हो! शिवचरित्राचा तू धागा हो! या विषयावर तिसरे व्याख्यानपुष्प श्री. प्रशांत देशमुख यांनी गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार या होत्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवकवर्ग व विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत देशमुख म्हणाले की, मराठी माणसाच्या रक्तात शिवचरित्र भिनले आहेत. स्वराज्याचा पाया हा निष्ठावंत मावळ्यांमुळे घडला आहेत. या निष्ठेची परीक्षा महाराजांच्या चरित्रामध्ये टप्प्याटप्प्यावर दिसते. याच निष्ठेच्या पायावर महाराजांनी स्वराज्य उभा केले आहे. आपण आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यात घालवतो. राजकीय नेतृत्वाकडे मी पणा असता कामा नये. संपूर्ण शिवचरित्रात मी ला कुठेही जागा नाही. आपल्या बापजाद्यांच्या पराक्रमाची साक्ष म्हणजे गडकोट किल्ले आहेत. इतिहास विसरता कामा नये. माणसांमध्ये कौशल्य थोडी असावीत पण ती नामी असावीत. जे कौशल्य आपल्याला आवडतं ते कौशल्य जीवापाड जपा. त्याला जगात तोड नाही.
शोधक नजर नेतृत्व करणाऱ्यांकडे असली पाहिजे. स्वराज्य नावाच्या विचाराला जिवंत ठेवण्यासाठी समर्पण भावना असली पाहिजे. शिवरायांचे विचार जिवंत ठेवले पाहिजे. अपयशातही कौतुक करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. विचार व तत्वावर ठाम राहावे त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी आपण तयार असले पाहिजे. खऱ्या अर्थाने स्वराज्य आणायचे असेल तर शिवचरित्रातील एक तरी प्रसंग आत्मसात करावा. आपल्याला जर अपयश आले तर पुरंदरचा तह आठवावा असा संदेश त्यांनी युवकांना दिला.
बारामती अग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये अडचणीवर मात करायला शिकले पाहिजे. महिलांचा सन्मान करणारे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज होते. गड किल्ले संवर्धन व भ्रमंती ही काळाची गरज आहे. आपले कर्तुत्व महत्त्वाचे आहे. ऐकणारे कान तयार झाले पाहिजेत. आपल्या संकल्पामध्ये सातत्य असले पाहिजे आणि त्यासाठी निरोगी आणि निर्व्यसनी रहा असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी तर आभार प्रा. भागवत यादव यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल म्हस्के, प्रा. राम काळे, डॉ. प्रतिमा पवार यांनी केले.