गौराईच्या आगमनदिनी चव्हाण कुटुंबात तान्हुल्या गौराईचे जन्माचे अनोखे स्वागत
मुलगी झाली तरच घराला खरं घरपण : पवार हॉस्पिटलचा उपक्रम समाजात नवी दिशा देतोय

कर्जत (प्रतिनिधी): संपूर्ण देशात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. घराघरात बाप्पांचे आगमन झाले असून रविवारी गौराईचे आगमन झाल्याने वातावरण अधिक मंगलमय झाले. याच मंगलमुहूर्तावर कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथील प्राची आणि विशाल चव्हाण या दाम्पत्याच्या घरी सोमवारी एका गोंडस मुलीचे आगमन झाले. त्यामुळे या कुटुंबात खरी ‘गौराई’च अवतरल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
चव्हाण कुटुंबाने या कन्यारत्नाचे स्वागत जल्लोषात केले. पारंपरिक पद्धतीने पूजा, आरती व स्वागतसोहळा करण्यात आला. “मुलगी हीच खऱ्या अर्थाने घरातील लक्ष्मी, समृद्धी आणि सुखशांती घेऊन येते,” अशी भावना या दाम्पत्याने व्यक्त केली.
पवार हॉस्पिटलचा आगळावेगळा उपक्रम
कर्जत शहरातील पवार हॉस्पिटलमध्ये मागील अनेक वर्षांपासून नवजात मुलींच्या जन्माचे अनोखे स्वागत केले जाते. या उपक्रमामागे स्त्रीजन्माला सन्मान व समाजाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडविण्याचा उद्देश आहे.
डॉ. दयानंद आणि डॉ. श्वेता पवार या दाम्पत्याने स्त्री-जन्माचे स्वागत करण्यासाठी “मुलगी झाली, वेलकम बेबी गर्ल किट” हा उपक्रम सुरू केला. आतापर्यंत तब्बल ४०० मुलींना जन्मावेळी या किटचे वितरण करण्यात आले आहे.
या किटमध्ये बाळासाठी आवश्यक वस्तूंसह जगभरातील कर्तृत्ववान महिलांची माहिती व स्त्रीविषयक आकर्षक पुस्तिका दिली जाते. ही पुस्तिका पालकांना आपल्या छकुलीकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यास मदत करते.
मुलगा हवासा हव्यास आणि स्त्रीजन्माची दुर्दशा
आजही काही ठिकाणी मुलगा जन्मला तरच उत्सव, जल्लोष केला जातो. परंतु मुलगी झाली की कुटुंबातील काहीजण नाराज होतात. विशेषतः दुसऱ्या खेपेस मुलगी झाली तर तरुण मातेला दोष देणे, राग व्यक्त करणे अशा घटना घडतात. काही अमानुष प्रकरणांत मुलींना कचऱ्यात किंवा नदी-नाल्यात टाकल्याच्या बातम्या आपण वाचतो.
एकीकडे समाजात बहीण, पत्नी, आई हवी असते; तर दुसरीकडे मुलगी जन्माला नको अशी भूमिका घेतली जाते. हा विरोधाभास समाजासाठी लाजिरवाणा आहे.
पवार दाम्पत्याची संवेदनशील भूमिका
या विरोधी मानसिकतेत बदल घडविण्यासाठी पवार हॉस्पिटलने उपक्रम सुरू केला आहे. “मुलगा-मुलगी एक समान आहेत” ही भावना प्रत्येक पालकांच्या मनात दृढ व्हावी, मुलगी ही नकोशी नसून अभिमानाची असावी, या हेतूने पवार दाम्पत्य समुपदेशनही करतात.
डॉ. दयानंद पवार सांगतात,
“प्रत्येक घरात स्त्री जन्माचे स्वागत आनंदाने व्हावे. आजवर समाजात ४०० हून अधिक मुलींच्या जन्मावेळी आम्ही पालकांचे समुपदेशन करून त्यांना ‘वेलकम किट’ दिले आहे. यातून समाजाच्या मानसिकतेत बदल होत असल्याचे आम्हाला जाणवते. स्त्री जन्माचे स्वागत करणे ही काळाची खरी गरज आहे.”डॉ. श्वेता पवार यांच्या मते,
“लहान मुलांमुळेच घराला घरपण येते. मुलगी असो वा मुलगा, ते आईवडिलांचे सुख, समृद्धी आणि आयुष्याचे खरे वैभव असतात. पण मुलगी झाल्यावर नाराजी व्यक्त करणे म्हणजे आई, पत्नी आणि बहिणीसारख्या नात्यांचा अपमान आहे.”समाजातील दृष्टीकोन बदलण्याची गरज
आज आधुनिक युगातही मुलगा हवा या हव्यासापोटी स्त्री जन्माकडे नकोसा दृष्टीकोन ठेवणारी मंडळी आढळतात. संततीसाठी अनेकजण नवस, उपवास, व्रत करतात, महागडे उपचार घेतात; मात्र मुलगी झाल्यावरच नाराजी व्यक्त करतात. हे चित्र बदलणे अत्यावश्यक आहे.
प्रत्येक मुलगी ही भविष्यातील कर्तृत्ववान स्त्री ठरू शकते. तिला प्रोत्साहन मिळाले तर ती आई, डॉक्टर, शास्त्रज्ञ, खेळाडू, कलाकार, सैनिक किंवा देशाची नेताही होऊ शकते. त्यामुळे तिच्या जन्माचे स्वागत अभिमानाने व्हावे.
कर्जतमधील आदर्श उपक्रम
पवार हॉस्पिटलचा हा उपक्रम केवळ वैद्यकीय सेवेपुरता मर्यादित नाही, तर तो सामाजिक जागृतीचाही एक मोठा भाग आहे. चव्हाण दाम्पत्याच्या घरी गौराईच्या आगमनाच्या निमित्ताने झालेल्या मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत हे याचेच उत्तम उदाहरण ठरले.
“प्रत्येक घरात कन्यारत्नाचा जन्म झाला की आनंदाने साजरा करावा. स्त्री जन्माचा सन्मान करणे हीच खरी समाजाची प्रगती आहे,” असे कर्जत येथील पवार हॉस्पिटलचे संचालक डॉ सौ श्वेता दयानंद पवार व डॉ दयानंद बाळासाहेब पवार या दाम्पत्याने सामाजिक संदेश दिला.



