दादा पाटील महाविद्यालयामार्फत श्री. ज्ञानेश योग आश्रम संस्था डोंगरगण येथील ‘पायी दिंडी सोहळा’चे स्वागत

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात श्री. ज्ञानेश योग आश्रम संस्था, डोंगरगड, तालुका जिल्हा नगर येथील ‘पाय दिंडी सोहळा’ आज गुरुवार दि. २२ जून रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात मुक्कामी आहे. या दिंडीचे दिंडी चालक ह भ प पुंडलिक महाराज जंगले शास्त्री डोंगरगण हे आहेत.
फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये या दिंडीचे महाविद्यालयात स्वागत करण्यात आले. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, प्राध्यापक वर्ग, सेवक वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने दिंडीच्या स्वागतासाठी उपस्थित होता.
महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हरिपाठ घेण्यात आला, आरती करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी वर्ग यांनी दिंडी भोवती फुगडी घालून आनंदोत्सव साजरा केला.
या दिंडीमध्ये एकूण ३०० वारकरी सहभागी आहेत. या वारकऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यातील जवळपास ८० टक्के वारकरी हे उच्चशिक्षित आहेत, सेवानिवृत्त आहेत. २००१ पासून दादा पाटील महाविद्यालयामध्ये या दिंडीचा मुक्काम असतो. पूर्वी ही दिंडी नगर -सोलापूर हायवेने पंढरपूर कडे प्रस्थान करायची. परंतु वारकऱ्यांच्या आणि कर्जत ग्रामस्थ आणि महाविद्यालयाच्या विनंतीला मान देऊन ही दिंडी गोदड महाराजांच्या पावनभूमीत कर्जत येथे दादा पाटील महाविद्यालयामध्ये मुक्कामी राहत आहे.
आज गुरुवार दिनांक २२ जून रोजी ह.भ.प. पुंडलिक महाराज जंगले शास्त्री, डोंगरगण यांचे हरिकीर्तन होणार आहे.
दिंडी सोहळ्याच्या स्वागतासाठी महाविद्यालयातील महाविद्यालय विकास समिती, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक, महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, माजी विद्यार्थी संघटना, एन.सी.सी. विभाग, एन.एस.एस. विभाग, जिमखाना विभाग, पॅरा मिलिटरी विभाग, यीन विभाग हे सहभागी झाले होते.
आजच्या कीर्तनसेवेनंतर उद्योजक भीमराव(आप्पा) नलवडे, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे, डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. भागवत यादव, प्रा. प्रतापराव काळे, प्रा. मोहनराव खंडागळे यांच्यावतीने सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन महाविद्यालयातच करण्यात आलेले आहे.