दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथील तिसऱ्या स्रीशिक्षिका साहित्य संमेलनातील चौदा पुरस्कार जाहीर

रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय कर्जत जि. अहिल्यानगर येथील मराठी विभागाच्या वतीने भारतातील स्त्रियांच्या जीवनात नवपरिवर्तन करणाऱ्या, स्रीहक्काच्या प्रणेत्या, भारतातील पहिल्या स्रीशिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तिसरे स्त्रीशिक्षिका साहित्य संमेलन शुक्रवार दि. ३ जानेवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविणाऱ्या स्त्रीशिक्षिकांना व वैचारिक प्रबोधन करणाऱ्यांना स्रीसुधारकांच्या नावे वेगवेगळे चौदा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यविषयक योगदान देणाऱ्या पुरस्कार्थींमध्ये राजमाता जिजाऊ पुरस्कार- डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर (पुणे), पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार- अनिताताई लक्ष्मण काळे पाटील (अहिल्यानगर), ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार- डॉ. कविता दत्तात्रय मुरुमकर (सोलापूर), लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुरस्कार- मीनाताई जगधने (श्रीरामपूर),
फातेमा शेख पुरस्कार – श्रीमती शेख नाजिया अब्दुलरहेमान (श्रीरामपूर),
ताराबाई शिंदे पुरस्कार- प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे (बेलापूर), रखमाबाई राऊत पुरस्कार- मेघना संजय झुझम (चंदगड-कोल्हापूर), मुक्ता साळवे पुरस्कार- डॉ. विद्या सुर्वे बोरसे (नाशिक),
माता रमाई पुरस्कार- डॉ. निशा भंडारे (पुणे), दुर्गा भागवत पुरस्कार- सौ. मनीषा पाटील (कवठेमहांकाळ-सांगली),
नजूबाई गावित पुरस्कार-
प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित (अहिल्यानगर), गेल ऑम्वेट पुरस्कार- सुवर्णा पवार (सांगली), बाया कर्वे पुरस्कार- प्रतिमा हेरंब कुलकर्णी (अकोले), भूमिकन्या पुरस्कार- मीरा देवळालीकर (कर्जत) अशा एकूण चौदा पुरस्कारांची घोषणा तिसरे स्रीशिक्षिका साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. राजेंद्र (तात्या) फाळके, निमंत्रक आमदार मा. रोहितदादा पवार, संयोजक प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्यावतीने करण्यात आली आहे.
या पुरस्कार निवडीकरिता साहित्यिक, सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील स्रीशिक्षिकांकडून, समाजिक कार्य करणाऱ्या महिलांकडून परिचयपत्र मागविण्यात आले होते. त्यातूनच प्रा. डॉ. महेबुब सय्यद, प्रा. डॉ. सुधाकर शेलार, प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर व प्राचार्य डॉ. संजय नगरकर या संयोजन समितीने वरील पुरस्कारांची निवड केलेली आहे.
तिसऱ्या स्रीशिक्षिका साहित्य संमेलनाचे आयोजन शुक्रवार, दि. ३ जानेवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात करण्यात आले आहे. या संमेलनामध्ये महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शाखेमध्ये सेवा करणाऱ्या जास्तीत जास्त स्रीशिक्षिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन दादा पाटील महाविद्यालय, कर्जतचे प्राचार्य व संमेलनाचे संयोजक डॉ. संजय नगरकर यांनी केले आहे.