दादा पाटील महाविद्यालयाच्या ‘मेरा रंग दे बसंती’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली

रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये ४ जानेवारी ते १० जानेवारी या कालावधीत कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. नुकतेच दादा पाटील महाविद्यालयात ‘मेरा रंग दे बसंती’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे व माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राची लोकाधारा, शिवजन्म ते शिवराज्याभिषेक या थीम घेऊन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यापूर्वी करण्यात आले होते. यावर्षी ‘मेरा रंग दे बसंती’ या थीमवर देशभक्तीपर बहारदार गीतांचे व समूहनृत्याचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमात कुठेही थीम वगळता इतर गीतांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. देशभक्तीपर गीतांसह भारतातील विविध राज्याचे दर्शन घडविणाऱ्या गीतांचा समावेश करण्यात आलेला होता. थीम बेसवर सर्व कार्यक्रम यशस्वी ठरले.
अवघ्या कमी कालावधीत महाविद्यालयाच्या कलावंत विद्यार्थ्यांनी शिवछत्रपतींचा जाज्वल्य इतिहास बहारदार पोवाड्यातून व समूह नृत्यातून सादर करण्यात आला. यशिवाय पंजाबचा भांगडा, गुजरातचा गरबा, राजस्थानी घूमर, महाराष्ट्राची लावणी, आदिवासी नृत्य, जोगवा, महाराष्ट्राची लोकाधारा यासोबतच महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाने देशभक्तीपर समूहनृत्याचे सादरीकरण केले. एनसीसी विभाग प्रमुख मेजर डॉ. संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर समूहनृत्याचे आयोजन करण्यात आले होते.
हा सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी व सांस्कृतिक विभागाचे सदस्य अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राम काळे प्रा. स्वप्निल म्हस्के व डॉ. प्रतिमा पवार यांनी तर कार्यक्रमाचे आभार माजी विद्यार्थी संघाचे कार्यकारणी सदस्य प्रा. विशाल म्हेत्रे यांनी मानले.