
कर्जतमध्ये बेकायदेशीररित्या वापरल्या जाणाऱ्या गोल्डन नंबर प्लेट्सवर पोलिसांनी अखेर कारवाई सुरू केली आहे. “समृद्ध कर्जत” साप्ताहिकाने काही दिवसांपूर्वी या विषयावर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या बातमीमुळे पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन थांबवण्यासाठी महात्मा फुले चौकात कारवाई सुरू करण्यात आली आहे.
गोल्डन नंबर प्लेटवर कारवाई, मात्र मॉडीफाय सायलेन्सरकडे दुर्लक्ष :-
कर्जत शहरात अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनचालक बेकायदेशीर गोल्डन नंबर प्लेट वापरत होते. यावर कारवाई होत नसल्यामुळे “समृद्ध कर्जत”ने हा मुद्दा प्रकाशझोतात आणला. पोलिसांनी याची दखल घेत महात्मा फुले चौकात कठोर कारवाई सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक दौलत जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक रमिज मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे.
मात्र, दुसरीकडे शहरात मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मॉडीफाय सायलेन्सरचा वापर करणाऱ्या वाहनांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अनेक ठिकाणी तरुण मॉडीफाय सायलेन्सर लावून वाहन चालवत असून, त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना, व्यापाऱ्यांना आणि वृद्धांना सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांत समाधान :-
गोल्डन नंबर प्लेटवरील कारवाईमुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. पोलिस प्रशासनाने बेकायदेशीर गोष्टींवर कठोर पावले उचलायला हवीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच, भविष्यात मॉडीफाय सायलेन्सरवरही तत्काळ कारवाई व्हावी, अशी अपेक्षा वाहनचालक नियमांचे पालन करत नसलेल्या नागरिकांवर कठोर पावले उचलली जातील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
पोलिस प्रशासनाकडून पुढील कृती अपेक्षित :-
यापुढेही वाहतुकीचे नियम पाळले जावेत आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत. कायदा सर्वांसाठी समान आहे, हे दाखवून देण्यासाठी पोलिसांनी मॉडीफाय सायलेन्सरचा मुद्दाही गांभीर्याने घेतला पाहिजे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
“समृद्ध कर्जत”च्या बातमीमुळे सुरू झालेली कारवाई नागरिकांच्या हितासाठी सकारात्मक बदल घडवेल, अशी अपेक्षा आहे.