स्टोन क्रशर्स कंपन्यामुळे शेतकऱ्यांचे शेतातील उभी पिके उध्वस्त झाले शेतकऱ्यांना न्याय मिळेना,आंदोलनाचा इशारा

कर्जत (प्रतिनिधी) :- अनिश इन्फ्रॉकॉन प्रा.लि. व सुखदेव अर्थमुव्हर्स या स्टोन क्रशर्स कंपन्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके उध्वस्त झाले शेतकऱ्यांना न्याय मिळेना, आंदोलनाचा इशारा देणाऱ्या शेतकऱ्यांवरच मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन पाठवले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,
आम्ही पुढे सह्या करणारे सर्व घुमरी, ता. कर्जत येथील शेतकरी आमच्या जमीनी घुमरी शिवारात असून आम्ही सर्व रा. ज्योतिबावाडी- कोकणगाव येथे राहतो.
सध्या नगर-सोलापूर रोडच्या रुंदणीकरणाचे काम सुरु असून या रस्त्यासाठी लागणारा कच्चा माल खडी, मुरुम हे पुरविण्याचे काम अनिश इन्फ्रॉकॉन प्रा. लि., घुमरी, व सुखदेव अर्थमुव्हर्स, घुमरी या दोन कंपन्यांकडे आहे. त्यांचा या ठिकाणी मोठा प्रोजेक्ट असून याठिकाणी खडी तयार करण्यासाठी, गौण खनिज उत्खनन करण्यासाठी मोठमोठ्या मशिनरी अहोरात्र काम करत आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात २४ तास धूळ उडत असते. ही धूळ आमच्या स. नं. ३५०, २५१ ३५२,३३८,३३९,३६१ मधील शेतात उभ्या असलेल्या विविध पिकांवर रोजच बसत आहे. त्यामुळे आमच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे व आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच शेती मशागतीची कोणत्याही प्रकारचे काम करता येत नाही.
याबाबत सर्व शेतकऱ्यांनी संबंधित कंपन्यांच्या अधिकान्यांशी वारंवार संपर्क साधला व नुकसान भरपाईबाबत तक्रार केली असता, आमचे कोणतेच म्हणणे ऐकूण घेण्यात येत नाही उलटपक्षी उडवाउडवीची उत्तरे देवून गुंडामार्फत आम्हाला दमदाटी करण्यात येत आहे. तसेच आमच्या वरील स. नं. मधूनच ‘त्यांनी त्यांचा मालवाहतुकीचा रस्ता रस्ता बळजबरीने केलेला आहे.
आपल्या सक्षम अधिकाऱ्यामार्फत सदर ठिकाणची पाहणी करून नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करण्यात यावा व सन २०२१ पासून ते आजपावेतो व येथून पुढेही होणाऱ्या सदर दोन्ही कंपन्याकडून आमच्या झालेल्या नुकसानीची भरपाई आम्हाला मिळवून देण्यात यावी व दोषींवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी मान्यता आम्ही सर्वजण कंपनीच्या गेट समोर बायका मुलांसह आमरण उपोषण करणार आहे.असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी काही जणांना बोलवून त्यांच्यावरच मिरजगाव पोलीस स्टेशन येथे शिवीगाळ व मारहाण केली व कंपनीचे नुकसान केले असे दाखवून खोटे गुन्हे दाखल केले आहेत अशी तक्रार शेतकरी गणपती शिंदे, रामदास शिंदे, किसन शिंदे, हरिभाऊ शिंदे, रामदास खेडकर, बापू शिंदे, सतीश शिंदे, शिवाजी पवार, महेश पवार यांनी केली आहे व निवेदनावर या सर्वांच्या सह्या आहेत. यामुळे आता या शेतकऱ्यांना कोण न्याय देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन्ही कंपन्यांचे हस्तक व अधिकारी या परिसरातील शेतकरी व नागरिक यांच्यावर पोलीस प्रशासन व राजकीय क्षेत्रातील काही लोकांना हाताशी धरून सातत्याने दम देणे, तुमच्यावर गुन्हे दाखल करू, आमची कंपनी फार मोठी आहे आमचे देशातल्या राजकीय लोकांबरोबर संबंध आहे असे म्हणत आहे असे देखील या शेतकऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या दोन्ही कंपन्यांचे महसूल प्रशासनामध्ये देखील अधिकाऱ्यांबरोबर सलोख्याचे संबंध असल्यामुळे सर्व काही आलबेल सुरू असल्याचे दिसून येते.