महाराष्ट्र राज्य प्रवीण प्रशिक्षक संघटनेच्या राज्याध्यक्षपदी आशिष बोरा यांची निवड


अहमदनगर (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य प्रवीण प्रशिक्षक संघटनेच्या शेगाव येथे झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतचे आशिष बोरा यांची राज्याध्यक्ष म्हणून सर्वानुमतेअप बिनविरोध निवड करण्यात आली. राज्यातील प्रशिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन आपण काम करू असा विश्वास यावेळी बोरा यांनी आपल्या निवडीनंतर सर्व प्रशिक्षकांना दिला.
शासनाच्या विविध योजनाची माहिती देण्यासाठी राज्यात कार्यरत असलेल्या प्रशिक्षकांची महाराष्ट्र राज्य प्रवीण प्रशिक्षक संघटना काम करत असून दि १७ ऑगस्ट रोजी शेगाव येथे संघटनेचे अधिवेशन मोठ्या उत्साहात व २७ जिल्ह्यातील प्रशिक्षकांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ प्रशांत शिंदे यांनी करताना प्रशिक्षकांच्या हिताच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबविले जाण्याची गरज व्यक्त केली. यावेळी संयोजन समिती सदस्य विलास सुरवसे यांनी संघटनेचे महत्व विशद केले तर अशोक सब्बन यांनी संघटनेची नोंदणी करण्याबाबत सविस्तर मांडणी करताना विविध संघटना, युनियन, यांची उदाहरणे दिली. मसुदा समिती सदस्य राहुल बागडे यांनी संघटनेचे उद्देश विषद करत घटनेतील विविध बाबी सर्वांसमोर मांडल्या. सध्या राज्यात काम करणाऱ्या प्रशिक्षकां पुढे अनेक अडचणी असून त्याचा विभाग निहाय आराखडा प्रभु गव्हारे, महादेव सुगावे, भारती जाधव, व प्रफुल्ल गुळवे यांनी मांडला, यावेळी आशिष बोरा यांनी आपली संघटना प्रथम सर्व प्रशिक्षकांशी संवाद साधेल त्यांना जोडण्याचे काम करेल, प्रशासनाशी समन्वय ठेवले, सतत पत्रव्यवहार करेल, त्याचा पाठपुरावा करेल व वेळ प्रसंगी तक्रार करून आंदोलनाचीही भूमिका घेईल मात्र आपल्याला प्रशासना बरोबर काम करायचे आहे त्यामुळे सुसंवाद महत्वाचा असल्याचे म्हटले.

प्रशिक्षण काल आज उद्या या विषयावर नाशिकचे प्रशांत पाटील यांनी विचार मांडताना आज एका बाजूला अनेक प्रशिक्षकांना काम मिळत नसताना दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी प्रशिक्षक मिळत नाही असे परस्पर विरोधी चित्र विषद करत प्रशिक्षकांनी स्वतः ला अपडेट करावे लागेल, बाहेर पडावे लागेल, विविध क्षेत्राचा शोध घ्यावा लागेल व हे करणाऱ्या प्रशिक्षकांना कामाची कमी नाही असे विचार मांडले.

यानंतर जिल्हा निहाय प्रशिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली, यावेळी या राज्यस्तरीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्य प्रवीण प्रशिक्षक संघटनेच्या राज्याध्यक्ष पदी आशिष बोरा याची निवड करण्यात आली त्यास सर्वांनी हात
वर करून अनुमोदन दिले. तर आगामी काळात संघटनेची नोंदणी करणे जिल्हा निहाय पदाधिकारी निवडीसाठी काल बद्ध कार्यक्रम करणे व काम करणाऱ्या प्रशिक्षकांना योग्य संधी देण्याचे अधिकार ही बोरा यांनाच देण्याबाबत ठराव मांडण्यात आले व त्यास ही सर्वांनी अनुमोदन दिले.

शेवटी अध्यक्षीय भाषणात आशिष बोरा यांनी प्रशिक्षकासाठी असलेल्या विविध संधीवर भाष्य करत, आपल्याला फक्त यशदा व जिल्हा परिषदेवर अवलंबून न राहता विविध प्रकारात संधी शोधाव्या लागतील, आगामी काळात डिजिटल प्रकारात अनेकांनी स्वतःचे कोर्स काढले असून त्याला उत्तम प्रतिसाद ही मिळत असल्याने आपल्याला तंत्रज्ञानाचा, एआय चा, सोशल मीडियाचा वापर करून आपली प्रगती साधावी लागेल, याच बरोबर विविध क्षेत्राचा अभ्यास करून गरजा ओळखून काम करावे लागेल असे म्हणत गेली दीड वर्षाचा आढावा घेतला. शेवटी पीयूष अवचार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मारुती बनसोडे यांनी केले. प्रवीण प्रशिक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी विविध समित्या व त्याचे सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.



