कर्जत येथे न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाचे उदघाट

कर्जत (प्रतिनिधी) :- न्यायाधीश आणि वकील यांचे वाचन दृढ असावे. मात्र काय वाचावे याचे देखील अवलोकन असणे महत्वाचे असते. न्याय देताना प्रत्येक बाजू सक्षमपणे मांडावी. जेणेकरून न्याय देण्याचे कार्य तत्पर आणि जलद होऊ शकते. आजमितीस कायदे विषयक अभ्यास महत्त्वाचा असून त्याचा वापर पक्षकार आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी करावा असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी यांनी केले. ते रविवार, दि. १० रोजी कर्जत येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर न्यायालयाचे उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संतोष चपळगावकर, अहमदनगर जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्यासह कर्जतचे न्यायाधीश डी. एम. गिरी, एम. डब्ल्यू, शेख, थाईल, कर्जत बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. कैलास शेवाळे आदी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना न्यायाधीश कंकणवाडी म्हणाल्या की, न्यायालयाची मागणी करताना निकष असतात. ते पूर्ण केल्यावरच त्यास मान्यता मिळते. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कर्जत न्यायालयाचे उदघाटन झाले अशी घोषणा करत असताना उद्घाटक म्हणून मला सर्वस्वी आनंद होत आहे. आरोपी, कैदी न्यायालयामध्ये समक्ष हजर न करता अनेक घटनांमध्ये आज ऑनलाइन न्यायप्रक्रिया देखील महत्वाची भूमिका बजावत आहे. निश्चित न्यायालयीन क्षेत्रात मनुष्यबळाची कमतरता असून त्यावर सुद्धा उत्तम न्याय देण्याचे काम सर्व सहकारी पार पाडत असल्याचे समाधान विभा कंकणवाडी यांनी व्यक्त केले. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संतोष चपळगावकर म्हणाले की, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय नव्याने सुरू होत असताना तेथील न्याय देणाऱ्याची जबाबदारी देखील वाढते.
आता सदरच्या न्यायालयात येणाऱ्या केसेसची संख्या वाढली जाणार असून ते तात्काळ मार्गी कशी लागतील याकडे लक्ष द्यावे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असली तरी त्यातून चांगले न्याय देण्याचे काम पार पाडणे सर्वांचे कर्तव्य आहे. पक्षकार, जनतेला तात्काळ न्याय मिळावा यासाठी हे न्यायालय निश्चित चांगले कार्य पार पाडेल असा विश्वास आहे.
जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा म्हणाले की, सन १९८९ पासूनची कर्जत दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाची मागणी आज पूर्ण झाली. त्याबद्दल सर्व कर्जतकर अभिनंदनास पात्र आहे. मात्र आता सर्वांची जबाबदारी आणखी वाढली आहे. न्यायदान देताना देखील स्पर्धा सुरू झाली आहे. तात्काळ न्याय देण्यासाठी सर्वानी कटीबद्ध असावे. जेणेकरून भविष्यातील प्रलंबित न्यायिक केसेसची संख्या घटली पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना. अड कैलास शेवाळे म्हणाले की, अनेक दिवसांपासूनची मागणी आज वास्तविकतेमध्ये मार्गी लागली याचे समाधान आहे. अनेकांचा पाठपुरावा या कामी मिळाले असून पक्षकार यांची
होणारी फरफट देखील थांबणार आहे. यामुळे न्यायदानाचे काम जलद आणि सुलभ तात्काळ मार्गी लागेल. यावेळी अॅड. अमोल सावंत, अॅड. राजेंद्र उमाप यांची भाषणे झाली. याप्रसंगी विविध
तालुक्यातील बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले तर आभार न्यायाधीश डी. एम. गिरी यांनी मानले.l