
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील प्रथम ISO मानांकित व उपक्रमशील शाळा चांदे खुर्द येथे दप्तर मुक्त शाळा उपक्रमात तृणधान्याचे आहारात महत्त्व या विषयावर स्वप्निल जगधने मंडळ कृषी अधिकारी यांचे व्याख्यान घेण्यात आले. संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दिपक कारंजकर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी तृणधान्यावर आधारित छोटीशी नाटिका व पोवाडा सादर करून प्रबोधन केले. त्यानंतर उपस्थित मान्यवर स्वप्निल जगधने यांची इयत्ता चौथीतील विद्यार्थी ओम शरद सूर्यवंशी याने मुलाखत घेतली. यात स्वप्निल जगधने यांनी आपल्या जीवनातील अनेक प्रसंग व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी मोबाईल वापर कमी करून जास्तीत जास्त अभ्यास करावा व आपल्या गावाचे नाव मोठे करावे, असा विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला. कृषी मंडळ अधिकारी अमर अडसूळ यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या आहारातील विविध बारकावे सर्वांना पटवून दिले. कृषी मंडळ अधिकारी स्वप्निल जगधने यांनी बोलताना विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच तृणधान्य व त्याची पौष्टिकता याचे महत्त्व कळाल्यास त्याचा त्यांना भविष्यात कसा फायदा होणार आहे, तसेच विद्यार्थ्यांची बालवयातील जागरूकता समाजमन बदलण्यास कशी फायदेशीर ठरणार आहे, पूर्वीची व आत्ताची जेवणातील विविधता कशी बदलली इत्यादी गोष्टींवर त्यांनी आपल्या व्याख्यानातून प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या शेवटी तृणधान्याची प्रतिज्ञा घेतली व विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करून यशस्वी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मारुती सूर्यवंशी यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी स्वप्निल जगधने, मंडळ कृषी अधिकारी अमर अडसूळ, कृषी सहाय्यक अविनाश सुद्रिक, शिक्षक बँक संचालक व केंद्रप्रमुख बाळासाहेब तापकीर ,शिक्षक संतोष वायसे, मान्यवर ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी श्री. देवरामजी लगड व केंद्रप्रमुख बाळासाहेब तापकीर यांचे मार्गदर्शन लाभले.