काँग्रेस हा विचार आहे तो कधीच संपत नसतो ; किरण पाटील

कर्जत (प्रतिनिधी):- काँग्रेस हा विचार आहे तो कधीच संपत नसतो काँग्रेस पक्ष संपला असे राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच म्हणतात मात्र या मागचा इतिहास असा आहे की काँग्रेस संपली म्हणणारे संपले आहेत. लोकसभा निवडणुकीत लंकेवर रोष नाही तर आ. रोहित पवारांच्या कार्यपद्धतीवर कर्जत तालुक्यातील काँग्रेस पक्ष नाराज असून विरोधकांकडे जाऊ शकत नसलो तरी स्वतंत्र मात्र लढू शकतो असा गर्भित इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
अहमदनगर द लोकसभा मतदार संघात महविकास आघाडीत ही सर्व आलबेल आहे असे नाही कर्जत तालुक्यात काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व नेते स्थानिक आ. रोहित पवार यांच्यावर नाराज असून त्यामुळे आगामी निवडणुकीत काय भूमिका घ्यायची यावर एकत्र येऊन विचार मंथन करत आहेत. आज कर्जत येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्याची बैठक आयोजित करण्यात आली. जिल्ह्याचे निरीक्षक प्रशांत दरेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अँड कैलास शेवाळे हे होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या अडचणी मुक्तपणे मांडताना स्थानिक राजकारणात काँग्रेसला विरोधकासारखी वागणूक मिळत असून मित्र पक्षाचे आ. पवार व त्याचे अनेक पीए काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना अजिबात किंमत देत नाहीत, कोणतेही काम केले जात नाही अथवा कोणतेही काम पण दिले जात नसेल तर आपल्याला निवडणुकीत यांच्या मागे उभे राहण्याची गरज काय अशा भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या.
अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेसचे चिन्ह नाही, कर्जत हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असताना ही जागा मोठेपणाने आम्ही मित्रपक्षाला दिली पण आज ही कर्जत तालुक्यात काँग्रेस पक्षाची ताकद आहे अनेक गावात पक्षाचे सरपंच आहेत. कर्जत तालुक्यात ही आ. रोहित पवारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे म्हणजेच मित्रपक्षाचे आमदार असताना त्याचा कोणताही लाभ पक्षाला मिळत नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही, त्यामुळे यापुढे आम्हाला गृहीत ही धरू नका, या अगोदर ही सर्व परिस्थिती आ. पवार यांना भेटून निदर्शनास आणून दिली होती त्यावेळी त्यांनी ही काही चुका झाल्या आहेत हे मान्य करत त्यात सुधारणा करण्याचा शब्द दिला होता मात्र त्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस पक्षाला वेगळा विचार करावाच लागेल असा इशाराही तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनी दिला.
यावेळी निरीक्षक प्रशांत दरेकर यांनी बोलताना कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्याच्या व नेत्याच्या भावना ना. बाळासाहेब थोरात यांचे पुढे मांडणार असून
आ. रोहित पवार येथे असताना छोट्या कार्यकर्त्यांना अनेक अडचणी येत आहेत, ही बाब गंभीर असून लवकरच ना. बाळासाहेब थोरात हे आगामी काळात लवकर मेळावा घेणार आहेत असे म्हंटले.
या मेळाव्यास दूध संघाचे चेअरमन शंकर देशमुख, तात्यासाहेब ढेरे, युवक तालुकाध्यक्ष सचिन घुले,
बापूसाहेब काळदाते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हर्शल शेवाळे, मुबारक मोगल, न. पं. पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल, मिलिंद बागल, ओंकार तोटे, जयसिंग थेटे पाटील, जकी सय्यद, महेश म्हेत्रे, गोकुळ इरकर, अजिनाथ गदादे, आदी सह अनेक जण उपस्थित होते.