कर्जत तालुका प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर ; २५ जानेवारीला वितरण
डॉ. कुमार सप्तर्षी, हेमंत देसाई, कमलेश सुतार, अन्वर राजन यांची उपस्थिती

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुका प्रेस क्लबचे पुरस्कार शनिवारी जाहीर करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ८ व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई, लोकशाही चॅनलचे संपादक कमलेश सुतार, राजकीय विश्लेषक अन्वर राजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. माजी आमदार तथा युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली खेड येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयातील भव्य प्रांगणात गुरुवार, दि. २५ जानेवारी रोजी १२. ३० वाजता या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा. किरण जगताप व सचिव प्रा. सोमनाथ गोडसे यांनी दिली.
पुरस्कारांचे हे सहावे वर्ष आहे. कर्जत तालुक्यातील समविचारी पत्रकारांनी एकत्र येऊन २०१९ मध्ये प्रेस क्लबची स्थापना केली. स्थापनेपासून प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा, विद्यार्थ्यांसाठी बातमी लेखन कार्यशाळा, जयंतीनिमित्त वक्तृत्व, निबंध, चित्र रंगवा स्पर्धा, पत्रकार अभ्यास दौरे व सहली, पर्यावरण पूरक उपक्रम, जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान यासह विविध शिबिरांमध्ये व्याख्याने व इतर सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून प्रेस क्लबने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पत्रकार संमेलन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रेस क्लबच्या पुरस्काराचे मानकरी असे : प्रसाद ढोकरीकर ( ज्ञानयोगी पुरस्कार), कल्याणीताई नेवसे ( नारी शक्ती पुरस्कार), डॉ. संदिप काळदाते ( आदर्श वैद्यक पुरस्कार ), एकनाथ (बापू ) धोंडे ( युवा उद्योजक पुरस्कार), ताराबाई कुलथे (आदर्श माता पुरस्कार), विलास निकत ( आदर्श सरपंच पुरस्कार), रवींद्र शेवाळे ( कृषिरत्न पुरस्कार), सर्व सामाजिक संघटना ( सामाजिकता पुरस्कार ).
प्रेस क्लबच्या समितीकडून पुरस्कारांची निवड करण्यात आली आहे. पत्रकार संमेलन व पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन कर्जत तालुका प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम ठिकाणी प्रेस क्लबच्या वतीने सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.