पालकमंत्री राधाकृष्ण विखेंना कर्जतच्या नगरसेवकांचे निवेदन

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत नगरपंचायतला कायमस्वरुपी मुख्याधिकारी, शाखा अभियंता व इतर रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात यावीत, या मागणीचे निवेदन कर्जत नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले. गटनेते संतोष मेहेत्रे, उपगट नेते सतीश पाटील, राष्ट्रवादीचे कर्जत शहराध्यक्ष सुनील शेलार, पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल, नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, नगरसेवक भास्कर भैलुमे, रवींद्र सुपेकर, लालासाहेब शेळके यांनी हे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, कर्जत नगरपंचायतला साधारण दीड वर्षापासून कायम मुख्याधिकारी मिळालेले नाहीत. तसेच शाखा अभियंता, लेखापाल, लेखापरीक्षक, नगर रचना सहाय्यक आदी पदे रिक्त आहेत. त्यामुळे कर्जत शहरातील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रिक्त पदांमुळे कामे वेळेवर होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे.
गतवर्षी कर्जत नगरपंचायतला माझी वसुंधरामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या नगरपंचायतीलाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपासून वंचित ठेवले जात आहे ही खेदजनक बाब आहे. शासकीय पातळीवरून याची दखल घेतली जात नसल्याने रिक्त पदावर नवीन नियुक्त्या झालेल्या नसल्याचे गटनेते संतोष मेहेत्रे यांनी म्हटले.
नगरपंचायतच्या सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांनी याच मागणीसाठी १ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. या निवेदनावर नगराध्यक्ष उषा राऊत, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, नगरसेवक छाया शेलार, सुवर्णा सुपेकर, उपगटनेते सतीश पाटील, भाऊसाहेब तोरडमल, प्रसाद ढोकरीकर, भास्कर भैलुमे, लंकाताई खरात, ज्योती शेळके, ताराबाई कुलथे, प्रतिभा भैलुमे, राजेंद्र पवार, आर्दीच्या सह्या आहेत.