कर्जत-जामखेड मतदारसंघात वीज वितरणाचे जाळे होणार मजबूत; आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश
तीन नवीन उपकेंद्र मंजूर, पाच उपकेद्रांचे विस्तारीकरण, ३३४ कि.मी.ची केबल लाईन तर ६५ कि.मी.ची लिंक लाईन मंजूर

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत-जामखेड मतदारसंघात वीज वितरण यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या आमदार रोहित पवार यांच्या आणखी एका प्रयत्नाला यश आले आहे. मतदारसंघात तीन नवीन उपकेंद्रांना मंजुरी मिळाली असून पाच उपकेंद्रांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. शिवाय कर्जत विभाग मध्ये ३३४ कि.मी. ची केबल लाईन आणि ६५ कि.मी.ची लिंक लाईनही मंजूर झाली आहे.
वीज, रस्ते ही विकासाची मानके समजली जातात, किंबहुना यावरूनच विकास मोजला जातो. त्यामुळे वीज आणि रस्त्यांसह इतरही पायाभूत सुविधा निर्माण करण्याकडे आमदार रोहित पवार यांनी जातीने लक्ष दिले. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आणि मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षांत वीज यंत्रणेचे मजबुतीकरण केले. आता पुन्हा नव्याने महावितरणच्या आरडीएसएस योजनेअंतर्गत मतदारसंघात चौंडी, चिलवडी आणि जळगाव या तीन नवीन उपकेंद्रांना मंजुरी आणली असून कुळधरण, मिरजगाव, भांबोरा, खांडवी आणि भानगाव या उपकेंद्रांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी नायगाव, घुमरी आणि दिघोळ हे उपकेंद्र आमदार रोहित पवार यांनी मंजूर करुन आणले असून त्यापैकी नायगाव आणि घुमरी या उपकेंद्रांचे लोकार्पण झाले आहे तर दिघोळ उपकेंद्राचे काम हे पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. तर कर्जत येथील वीज उपकेंद्रांच्या विस्तारीकरणाचेही काम करण्यात आले आहे.
याशिवाय गळती व वीज हानी रोखण्यासाठी कर्जत विभागात ३३४ कि.मी.ची एबी केबल टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यामध्ये खर्डा, आनंदवाडी, राजुरी, सारोळा, जामखेड, तरडगाव, कर्जत, चापडगाव, मिरजगाव, बेलगाव, जुनी कोंभळी, जुने मलठण, नवी कोंभळी, नवीन मलठण, कुळधरण, शिंदा, पिंपळवाडी, कोपर्डी, नांदगाव, येसवडी, खांडवी, दूरगाव, भोसे, धालवडी, थेरगाव, चांदा, मुळेवाडी, थेरवडी, हनुमाननगर, जामदरवाडा, राक्षसवाडी, नाथाचीवाडी, टाकळी खु, चांदगाव, राजुरी, पाडळी, अरणगाव, निमगाव गांगर्डा, मांदळी, बेलवंडी या गावांचा समावेश आहे. तसेच कर्जत विभागात ६५ कि.मी.ची लिंक लाईनही मंजूर झाली असून त्याचा फायदा कोंभळी, चांदे, जामखेड, अरणगाव, खांडवी, कर्जत, नांदगाव आणि राशीन-येसवडी या गावांना होणार आहे.
या सर्व कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ही कामे सुरु करण्यात आल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी सांगितली.
कृषी आकस्मितता निधीतून (एसीएफ) घुमरी उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून दिघोळ उपकेद्रांचेही काम लवकरच सुरु होणार आहे आणि राशीन उपकेंद्राच्या विस्तारीकरणाचेही काम पूर्ण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना अखंडीत आणि पुरेशा दाबाने वीज पुरवठा होण्यास मदत होणार आहे.