कर्जत पोलिसांची दारू अड्यावर कारवाई

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत पोलिसांनी गावठी दारू अड्डयांवर ठिकठिकाणी छापे टाकून शेकडो लिटर कच्चे रसायन नष्ट केले. या कारवाईत पोलिसांनी एक कार ताब्यात घेतली आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी या कारवाईत स्वतः सहभागी होवून अवैध धंदेवाल्यांना चाप बसवला आहे.पोलीस निरीक्षक घनश्याम बळप हे स्टाफसह कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बारडगाव दगडी गावाचे शिवारात मंचली अमोल पवार ही गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन बनवत आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी स्टाफसह तेथे जाऊन छापा टाकला. त्यामध्ये एक महिला राहत्या घराच्या आडोशाला गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन लाकडाच्या सहाय्याने ढवळत असताना दिसली. त्या ठिकाणी ५ बॅरलमध्ये प्रत्येकी २०० लिटरप्रमाणे १००० लिटर ५० रुपये दराने ५० हजार रुपये दराचा मुद्देमाल जागीच नष्ट केला.
चालक अक्षय ताराचंद पवार हा गाडी सोडून गाडीतून उतरून पळून गेला. गाडीची पंचांसमक्ष झडती घेतली असता देशी दारु संत्रा कंपनीच्या ३२ बाटल्या प्रत्येकी किंमत ७० रुपये प्रमाणे २२४० रुपयांचा मुद्देमाल व ३ लाख ५० हजार रुपयांची कार ताब्यात घेतली.
पोलिसांना बारडगाव दगडी गावाच्या शिवारात विठ्ठल किटल्या चव्हाण हा गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन तयार करीत असल्याचे समजले. येथील कारवाईत घराच्या आडोशाला २०० लिटरचे २ बॅरेल असे ४०० लिटर रसायन पोलिसांनी जागीच नष्ट केले. उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, पोलीस नाईक संभाजी वाबळे, पांडुरंग भांडवलकर, नरोटे, पोलीस कॉन्स्टेबल महादेव कोहक, लक्ष्मण ढवळे, दीपक कोल्हे, नितीन धस, महिला पोलीस नाईक कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.