दादा पाटील महाविद्यालयाचा मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर सन्मान

कर्जत (प्रतिनिधी) :- आंतरराष्ट्रीय डिटॉक्स दिनानिमित्त ‘झेप फाउंडेशन’या आंतरराष्ट्रीय संस्थेने गेटवे ऑफ इंडिया, मुंबई या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात दादा पाटील महाविद्यालयाचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. स्वप्नील म्हस्के यांनी व सांस्कृतिक विभागाचे विद्यार्थी यांनी सदर सन्मान स्वीकारला. यानिमित्त दादा पाटील महाविद्यालय व झेप फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार झाला.
झेप ही आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी संघटना असून जगातील ६३ देशांत संगणक साक्षरता, पर्यावरण रक्षण, मोबाईल वापराचे तोटे या ज्वलंत मुद्द्यांवर जगभर कार्य करते आहे. दादा पाटील महाविद्यालयाने आजवर या ज्वलंत मुद्द्यांवर अनेक व्याख्याने, पथनाट्य, मूकनाट्य आदिंच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाजामध्ये प्रबोधन केलेले आहे. तसेच मुंबई येथे नुकत्याच झालेल्या जागतिक डिटॉक्स स्पर्धेत दादा पाटील महाविद्यालयाच्या मूकनाट्याची निवड करण्यात आलेली होती. महाविद्यालयाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल मुंबई येथील
गेट वे ऑफ इंडिया समोर झालेल्या भव्यदिव्य सन्मान सोहळ्यात दादा पाटील महाविद्यालयाचा व सांस्कृतिक विभागातील विद्यार्थी कलाकारांचा सन्मान झेप या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष रेखा चौधरी, सिने अभिनेते अनुपम खेर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सदर सन्मान दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, उपप्राचार्य डॉ प्रमोद परदेशी, मूकनाट्य संघ व्यवस्थापक प्रा. स्वप्नील म्हस्के व विद्यार्थी कलाकारांनी स्वीकारला. सदर कार्यक्रमात सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या दुष्परिणामावर वैचारिक मूकनाट्य सादर केले. गणेश पवार, प्रियंका सस्ते, अंजली अडसूळ, श्वेता काकडे, अजित पवार, ज्ञानेश्वर वायसे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट मूकनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी विद्यार्थ्यांचाही सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यानिमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय देशाच्या आर्थिक राजधानीतील गेटवे ऑफ इंडिया समोर सन्मानाने झळकले.
महाविद्यालयाच्या या सन्मानाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पासाहेब धांडे, राजेंद्र निंबाळकर, माजी विद्यार्थी संघटना व महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर सेवकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.