आ रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामासाठी १ कोटीचा निधी; बुधवारी होणार भूमिपूजन

कर्जत (प्रतिनिधी): – समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया घडवणारे पवित्र ठिकाण म्हणजे शाळा. शाळा दर्जेदार असतील तरच देशाचे भवितव्य सुरक्षित राहणार आहे. हाच हेतू डोळ्यासमोर ठेऊन आमदार रोहित पवार मागील तीन वर्षांपासून मतदारसंघातील शैक्षणिक सुविधा वाढविण्यावर भर देत आहेत.
मतदारसंघातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित व्हावे यासाठी आमदार पवार वैयक्तिक प्रयत्नातून सातत्याने जिल्हा परिषद शाळांना अद्यावत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.याचाच एक भाग म्हणून मिरजगाव जिल्हा परिषद शाळेच्या सुसज्य अशा नूतन इमारतीच्या बांधकामासाठी आमदार पवार यांच्या प्रयत्नातून तब्बल १ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मिरजगाव जिल्हा परिषद शाळेला २०२४ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत.ऐतिहासिक महत्व असणाऱ्या या शाळेतून आजपर्यंत अनेकांनी स्वतःला घडवले आणि सिद्ध करून दाखवले आहे. सद्य स्थितीला शाळेची गुणवत्ता सर्वश्रुत आहे. भौतिक सुविधांची कमतरता मागील अनेक वर्षांपासून जाणवत होती. विद्यालयाची इमारत जीर्ण झाली असून मोडकळीस आली होती. हीच बाब लक्षात घेऊन आमदार पवार यांनी नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. बुधावर दिनांक २७ रोजी आमदार पवार यांच्या शुभहस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहे.