एच. आय. व्ही. एड्स जनजागृती नाट्य स्पर्धेत दादा पाटील महाविद्यालयाचे यश.

कर्जत (प्रतिनिधी) :- १२ ऑगस्ट ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ या निमित्ताने युवा वर्गामध्ये एच. आय. व्ही /एड्स बाबत जनजागृती होण्याकरिता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांचे मार्फत २८ ऑगस्ट २०२३ रोजी नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत सहभागाकरिता एकूण ३० महाविद्यालयांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २३ महाविद्यालयाच्या संघाने प्रत्यक्ष सहभाग घेऊन नाट्य सादरीकरण केले. यामध्ये दादा पाटील महाविद्यालयातील एन.एस.एस विभागातील विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
एच आय व्ही संसर्गाचे मार्ग, एच आय व्ही/ एड्स बाबत समज/गैरसमज, १०९७ हेल्पलाइन नंबर बाबत माहिती, एचआयव्ही एड्स कायदा २०१७ या विषयावर आयोजित या स्पर्धेत सर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण नाट्याचे सादरीकरण करून एच. आय. व्ही/ एड्स बाबत जनजागृती केली. त्याचप्रमाणे इतरांचे गैरसमज दूर केले व समाजात संसर्गितांबाबत भेदभाव होऊ नये, असा संदेश दिला व २०१७ कायद्याबाबत जनजागृती केली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके व महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, माजी विद्यार्थी संघटना, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकांनी अभिनंदन केले.
या स्पर्धेमध्ये गणेश पवार, अश्विनी वाघमारे, खरमरे सुप्रिया, पिठेकर नीलम, मुळे निकिता, जाधव संध्या, निंबाळकर प्रणाली, दळवी श्रीमंत, शिंदे प्रकाश या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना प्रा. स्वप्निल मस्के, डॉ. वाल्मीक कापसे, प्रा. बलभीम महानगर व जिल्हा कुटीर रुग्णालयातील प्रमुखांचे मार्गदर्शन लाभले.