राशीन येथील मंडळ कृषी अधिकारी ज्ञानेश्वर सातपुते निलंबित

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील मंडळ कृषी अधिकारी ज्ञानेश्वर सातपुते याने शेततळ्याच्या तांत्रिक मंजुरीसाठी शेतकऱ्याकडून पाच हजारांची लाच स्वीकारतानाचा व्हिडीओ ‘समृध कर्जत’ वरून व्हायरल करण्यात आला होता. त्याची राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी गंभीर दखल घेतली. याप्रकरणी मंडळ कृषी अधिकारी सातपुते याला निलंबित केले आहे.
सातपुते याच्या विरोधात विभागीय चौकशीअंती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी आयुक्त यांनी स्पष्ट केले. ९ जानेवारी रोजी कर्जत तालुक्यातील देशमुखवाडी येथील शेतकऱ्यांकडून शेततळ्याच्या तांत्रिक मंजुरीसाठी पाच हजारांची लाच घेण्याची घटना राशीन येथील मंडळ कृषी कार्यालयात घडली होतो. कार्यालयातच या प्रकाराचे व्हिडीओ चित्रीकरण झाल्याचे स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
शेततळे, फळबाग लागवड योजना आदी योजनांचा शेतकरी लाभार्थी लाभ घेताना शेतकऱ्यांची अडवणूक करणे, पिळवणूक करणे, लाभार्थ्यांला पैशाची मागणी करणे अशा तक्रारी राशीनचे मंडळ कृषी अधिकारी सातपुते याच्या विरोधात देशमुखवाडी येथील शेतकऱ्यांनी लेखी तक्रार केली होती. या सर्व प्रकाराची दखल घेऊन अखेर सातपुते याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.