आमदार रोहित पवार यांच्या मागणीला यश; शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी मिळणार हक्काचे आवर्तन
आमदार रोहित पवार यांच्या मागणीनुसार कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न; कुकडीच्या उन्हाळी आवर्तनाबाबत झाला निर्णय

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील 54 गावांच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा असणाऱ्या कुकडी डाव्या कालव्यातून यंदाचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात यावे याबाबत आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन पाणी सोडण्यासंदर्भात समितीची बैठक बोलविण्याची विनंती केली होती. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्रिमहोदयांनी तात्काळ कालवा सल्लागार समितीची बैठक बोलवून उन्हाळी आवर्तनाबाबत नुकताच निर्णय घेतला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना सोडण्यात आलेले मागील हंगामातील आवर्तन मार्च 2023 मध्ये संपून जवळजवळ एक ते दीड महिना उलटला आहे आणि सध्या उन्हाची तीव्रता देखील वाढत आहे, त्यामुळे पाण्याची पातळी वरचेवर खालावत आहे हीच गोष्ट ओळखून चारा पिके, फळबागा, उन्हाळी पिके इत्यादी पिकांसाठी पाण्याची टंचाई भासत असतानाच आमदार रोहित पवार यांनी कुकडीच्या उन्हाळी आवर्तनाबाबत मागणी केली आणि लगेच मंगळवारी याबाबत बैठक पार पडली असून त्यामध्ये 20 मे पासून पुढील एकूण 30 दिवस उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला आमदार रोहित पवार हे देखील स्वतः उपस्थित होते.
निर्णयानुसार आता शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे आवर्तन 20 मे पासून सोडण्यात येणार आहे. आणि एकूण 30 दिवस हे आवर्तन सोडण्यात येणार आहे. आपल्या कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्यापासून टाळण्यासाठी आणि ओलिताखालील येणाऱ्या पीक क्षेत्रासाठी व पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर कालवा सल्लागार समितीची बैठक बोलावावी अथवा आपल्या अधिकारात पुढच्या काही दिवसात उन्हाळी आवर्तन सुरू करण्याबाबतचे आदेश द्यावेत अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती आणि आता त्यांच्या या मागणीला यश आल्याचे पाहायला मिळत आहे.
– आ. रोहित पवार