स्त्रीशिक्षिका साहित्य पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

कर्जत (प्रतिनिधी) :- केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर, संपूर्ण भारतातील स्रियांच्या जीवनात नवपरिवर्तन करणाऱ्या, स्त्रीहक्काच्या प्रणेत्या, स्त्रीशिक्षणाच्या उद्गात्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका होत. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना उजाळा मिळावा, स्त्रीसक्षमीकरणाचा जागर व्हावा म्हणून दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथील मराठी विभागाच्या वतीने ‘दुसरे स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन’ बुधवार, दि. ०३ जानेवारी २०२४ रोजी सावित्रीबाई फुले घेण्यात येणार आहे.
या संमेलनात अहमदनगर जिल्हा व महाराष्ट्रातील स्री शिक्षिका साहित्यिक सहभागी होत आहेत. नवसाहित्यिक स्री शिक्षिकांना सशक्त विचारपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच, महिलांचे अर्थविश्व व नवतंत्रज्ञानाच्या जाणीवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्यविश्वाकडून स्त्रीशिक्षिकांच्या असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी एक दिवसाचे दुसरे स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.
दुसऱ्या स्त्री शिक्षिका साहित्य संमेलनामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या व सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यविषयक योगदान देणाऱ्या लोकशिक्षिकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे. ज्यात राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे, रखमाबाई राऊत, रमाबाई रानडे, रमाई आंबेडकर, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, बाया कर्वे, दुर्गा भागवत, नजुबाई गावित, गेल ऑम्वेट, भूमिकन्या यांच्या नावाने विविध पुरस्कार दिले जाणार आहेत. या पुरस्कारासाठी आपल्या साहित्यिक कार्यकर्तृत्त्वाचा आढावा घेणारा लेखी प्रस्ताव/परिचयपत्र दि. २० डिसेंबर २०२३ पर्यंत पाठविण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
संबंधित पत्त्यावर आपले परिचय पत्र ईमेल किंवा मोबाईल नंबरवर PDF स्वरुपात पाठवून आपल्या साहित्यिक कार्याचा सन्मान करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून द्यावी असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले आहे. मराठी विभागातील प्रा. सीमा डोके (९४०४७८१८८९, seemadake81@gmail.कॉम), डॉ. भारती काळे (९४२२२९४०६२, bharatikale131984@gmail.कॉम), प्रा. सुखदेव कोल्हे (८६०५२९८५२९, kolhe111981@gmail.कॉम) यांच्या मोबाईल नंबरवर अथवा ईमेलवर परिचयपत्र पाठवावे
स्रीशिक्षिका साहित्यिक पुरस्कारासाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. सदर पुरस्कार बुधवार दि. ०३ जानेवारी २०२४ रोजी दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे स्री शिक्षिका साहित्य संमेलनाच्या पुरस्कार वितरण समारंभात दिला जाईल. पुरस्कार्थींना एस. टी./ रेल्वे प्रवासभाडे आयोजकांकडून दिले जाईल. सदर संदेश आपल्या परिचयाच्या असणाऱ्या, शिक्षण क्षेत्रात सामाजिक बांधिलकी मानून कार्य करणाऱ्या, लिहिणाऱ्या साहित्यिक व्यक्तींना पाठवावा ही नम्र विनंती