दुधोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ग्रामस्थांनी ठोकले टाळे

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील दुधोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ग्रामस्थांनी टाळे ठोकले आहे. रिक्त असलेल्या ४ जागेवर शिक्षकांची नेमणूक करावी या मागणीसाठी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शाळेचे कार्यालय कुलूप लावून बंद केले. ग्रामपंचायतच्या वतीने शिक्षक मागणीचे निवेदन कर्जतच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र त्यावर योग्य कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला.
दुधोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीचे वर्ग आहेत. मात्र येथे मुख्याध्यापकासह एक पदवीधर शिक्षक तसेच दोन शिक्षकांच्या जागा अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या प्रश्नावर सरपंचांनी ग्रामपंचायतच्या वतीने निवेदन दिले होते.
दरम्यान केंद्रप्रमुख राऊत हे शाळेमध्ये आले. गटशिक्षणाधिकाऱ्यांना संपर्क केल्यानंतर दोन दिवसात शिक्षक देऊ असे ग्रामस्थांना सांगण्यात आले आहे. मात्र शिक्षक मिळाल्यानंतरच शाळा सुरू करू असा निर्णय ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे दोन दिवसात शिक्षक नेमून शाळा सुरळीत सुरू होते का ? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज जांभळे, उपाध्यक्ष नामदेव भोसले, सरपंचपती राजेश जांभळे, उपसरपंच रवींद्र जांभळे, माजी सरपंच राजेंद्र परकाळे, रमेश जांभळे, सचिन जांभळे आदींनी शाळेला कुलूप ठोकले.