टाकळी खंडेश्वरीत सभासदाना बोनस वाटप

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत शेतीसह त्याच्या जोडीला दुग्ध व्यवसाय केल्यास त्या शेतकऱ्यांची प्रगती होते. यासाठी प्रत्येकाने शेतीस पूरक आणखी जोड व्यवसायाकडे आता वळले पाहिजे. अरूणोदय संस्था यावर काम करते हे आनंददायी आहे. आज सर्व उत्पादकांना लाभांश वाटप कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवाळी गोड होणार आहे. हे त्या संस्थेचे प्रगतीचे लक्षण असते असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.
टाकळी खंडेश्वरी (ता.कर्जत) येथे अरूणोदय दूध संकलन केंद्र आयोजित दिपावली फराळ आणि दूध उत्पादकांना लाभांश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सरपंच अमोल पाटील म्हणाले की, अरूणोदय दूध संकलन केंद्र हे दूध उत्पादकांच्या सहकार्याने गगन भरारी घेत आहे. सभासदाची दिवाळी गोड आणि आनंदाची व्हावी हा बोनस वाटपाचा व फराळ कार्यक्रमाचा उद्देश असून या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणखी मोठी झेप आगामी काळात घ्यायची आहे असा आशावाद व्यक्त करीत उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील म्हणाले की, कर्जत तालुक्यात सर्वाधिक दूध उत्पादन टाकळी खंडेश्वरीतून होते. ते आमचे भाग्य आहे. बावर न थांबता आता सर्व उत्पादकांनी दुग्ध उत्पादन क्षेत्रात प्रगती करावी. दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारले जावे व येथे दुधाचे हब व्हावे, मतदारसंघाला दूरदृष्टी असणारा लोकप्रतिनिधी लाभला. त्याचा फायदा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने घेतला पाहिजे. सहकार संस्था चालवताना स्वतःचा फायदा न पाहता संस्थेसह त्यांच्या सर्व सदस्य, लाभार्थी, उत्पादकांचा पहावा
असे सूचित केले. आमदार रोहित पवार यांनी बोलताना या अरुणोदय दूध संकलन संस्थेसारख्या ची सर्वत्र गरज आहे, आज शेती करने सोपे नाही, कधी पाऊस नाही तरी कधी अतीवृष्टी होते व शेतकरी यात अडकत जातो दूध व्यवसायच असा आहे ज्यामुळे शेतकऱ्याच्या हातात दोन पैसे येत राहतात. या गावाचा विकास यातून होतच आहे, याबरोबरच सर्वागीण विकास ही झाला पाहिजे, फक्त रोड करणे म्हणजे विकास नव्हे, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कामे करावी लागतात व आपण निवडून आल्यापासून त्याकडे विशेष लक्ष दिले असून माल ठेवण्यासाठी गोडावून बांधणे, ऐका ऐवजी जास्त खरेदी केंद्र सुरू केले लवकरच कोल्ड स्टोरेज होणार आहे. पीक विम्याचे अडकलेल्या पैशासाठी प्रयत्न केले. एमआयडीसी साठी प्रयत्न सुरू आहेत मात्र सध्या आडवा आडवी चे राजकारण सुरू आहे. मतदार संघातील साडे चारशे कोटींची विकास कामे विरोधकांनी अडवले होते. त्यावर न्यायालयातुन
स्थगिती उठवली असून ती कामे मार्गी लागतील. एमआयडीसी प्रलंबित आहे. निश्चित ती मतदारसंघासाठी आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. कर्जत डेपोचे काम ९०% पूर्ण झाले. पिण्याच्या पाण्यासाठी तुकाई योजना असून शेतीसाठी त्या पाण्याचा उपयोग करता येणार नाही म्हणून आपण एक स्वतंत्र योजना शासनाकडे सादर केली आहे पण तीला अडचणी येऊ नये म्हणून आताच ती जाहीर करत नाही पण योग्य वेळी त्याची माहिती सर्वा समोर येईल असे म्हणत कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या राजकारणाबाबत बोलत विरोधकांचे नाव न घेता जोरदार टीका केली. यावेळी विजय भंडारी, पोपट खोसे, संतोष भोसले, राजेंद्र डुबल यांची भाषणे झाली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम कानगुडे, संग्राम पाटील, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष रघुआबा काळदाते, विनोद राऊत, डॉ सागर ढोबे, बंटी यादव, आदीसह अनेक जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष ढोबे यांनी केले.