व्यक्तीच्या जडणघडणीत वाचन व लेखनाचे अनन्य साधारण महत्व : कवयित्री स्वाती पाटील
मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त काव्य मैफिलीतून कुसुमाग्रजांना अभिवादन

कर्जत (प्रतिनिधी) :- “व्यक्तीच्या जडणघडणीत वाचन व लेखनाचे अनन्य साधारण महत्व आहे.व्यक्तीच्या विचारसरणीमध्ये प्रगल्भता येण्यासाठी ज्ञान मिळवणे गरजेचे आहे आणि हे ज्ञान मिळवण्याचे महत्वाचे साधन म्हणजे पुस्तक आहे”असे प्रतिपादन प्रसिद्ध कवयित्री स्वाती पाटील यांनी केले. येथील महात्मा गांधी विद्यालयात “मराठी भाषा गौरव दिनानिमित्त”आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपप्राचार्य लालासाहेब शिंदे होते.
कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. विद्यालयातील विद्यार्थ्यांना बसवून “माय मराठी” हे नाव साकारण्यात आले.कार्यक्रमाची सुरूवात “जय जय महाराष्ट्र माझा”या राज्यगीताने करण्यात आली.त्यानंतर कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 5 वी ते 9 वी च्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या, आलेल्या मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विद्यालयातील उपशिक्षक सचिन जाधव, परशुराम गांगर्डे,ज्योती जाधव यांनी देखील आपल्या कवितांचे सुस्वरात गायन केले.
या कार्यक्रमाला कर्जत नगरपंचायतच्या नगरसेविका ज्योती शेळके,छाया शेलार यांनीही आपल्या मनोगतामधून मराठी भाषेचे महत्त्व,आपली संस्कृती याचा वारसा आपण जतन करून तो समृध्द करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन आपल्या भाषेची कीर्ती संपूर्ण जगात कशी पोहचेल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे,असे प्रतिपादन केले.
अध्यक्षिय मनोगतामधून उपप्राचार्यांनी आपल्या कवितेच्या सादरीकरणातून मराठी भाषेचा महिमा सांगितला. तसेच मराठी भाषेची निर्मिती व तिची परंपरा याबाबत माहिती दिली.याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य मुस्तफा सय्यद,पर्यवेक्षक राजेंद्र गीते,जेष्ठ शिक्षिका सुनिता राजळे,संध्याराणी कदम तसेच सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भालचंद्र देशमुख, सूत्रसंचलन सारिका खराडे,वृषाली भांडवलकर तर आभार जयश्री कल्लापुरे यांनी मानले.