दादा पाटील महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न.

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त दादा पाटील महाविद्यालायात हीरक महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक विभाग आयोजित ‘कर्मवीर जयंती सप्ताह, कर्मवीर जीवन दर्शन प्रदर्शन व कर्मवीर व्याख्यानमाला’ दि. २१ ते २९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत संपन्न होतो आहे.
शनिवार दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात ‘पालक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते.
सकाळी ११ वाजता ‘पालक मेळावा’ चे आयोजन करण्यात आले होते. या पालक मेळाव्याला जवळपास ३०० पालक उपस्थित होते. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून मांडगे रवींद्र लक्ष्मण, फरांडे सदाशिव जयवंत, सौ. स्वाती भगत, प्राचार्य प्रा. विक्रम कांबळे श्री. संभाजी गदादे, प्रतीक्षा पवार, बिभीषण डमरे, किशोरी लांभोरे, घोडके आदि पालकांनी आपली मनोगते व्यक्त करून महाविद्यालयातील शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले.
या पालक मेळाव्याला प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी संबोधित करून महाविद्यालयातील शैक्षणिक उपक्रमाची व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करत असलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती उपस्थित पालकांना दिली. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, दादा पाटील महाविद्यालयात काय आहे यापेक्षा अजून सर्वोत्तम काय करता येईल याकरिता विविधपूर्ण उपक्रम महाविद्यालयात घेतले जातात व घेतले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना पालकांनी आवडत्या विषयात करिअर करण्यासाठी संधी द्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याला नाऊमेद न करता प्रेरणा, मार्गदर्शन देण्याचे काम महाविद्यालयातील प्राध्यापक करतात. या महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे समुपदेशक विद्यार्थ्यांना जीवनाचा मुलमंत्र सांगत असतात. विद्यार्थ्यांचा न्यूनगंड दूर करून आत्मविश्वास देण्याचे काम महाविद्यालय करते. कॉलेज वेळानंतर आपला पाल्य घरी काय करतो व कोणाच्या संगतीत आहे यावर पालकांनी आता लक्ष देणे गरजेचे आहे. आजच्या मुलांनी संघर्ष अनुभवलेला नसतो त्यामुळे त्यांना परिस्थितीची जाणीव नसते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्याचे काम महाविद्यालय करत असल्याचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले.
या पालक मेळाव्याचे संयोजन प्रा. सुनील देशमुख, प्रा. प्रतापराव काळे, प्रा. असीफ सय्यद यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी यांनी केले. आभार प्रा. सुनील देशमुख यांनी तर सूत्रसंचालन प्रा. किरण भोसले व प्रा. स्वप्निल म्हस्के यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सकाळच्या सत्रात खुल्या ‘निबंध स्पर्धा’ आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे संयोजन डॉ. बेबी खिलारे, प्रा. वृद्धेश्वर गरुड यांनी केले.
कर्मवीर जयंती सप्ताह कर्मवीर जयंती दर्शन प्रदर्शन व कर्मवीर व्याख्यानमालाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ. प्रमोद परदेशी व समन्वयकांनी केलेले आहे.