कर्मवीर भाऊराव पाटील यांचे दातृत्त्व व कर्तृत्त्व टिकविणे गरजेचे…विकास देशमुख

कर्जत (प्रतिनिधी) :- “भाव तिथे मंदिर तसे गाव तिथे शाळा हे ब्रीद वाक्य घेऊन कर्मवीर भाऊराव पाटलांनी महाराष्ट्रभर ग्रामीण भागात शिक्षणाचे रोपटे लावले. आज त्याचे रूपांतर वटवृक्षात झालेले आहे. या शिक्षणरुपी वटवृक्षाचा सांभाळ करण्याचे व वाढविण्याचे काम आपणा सर्वांना करावयाचे आहे” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय व सौ. सो. ना. सोनमाळी कन्या विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर जयंतीनिमित्त व हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘सन्मान कर्मयोध्यांचा’ कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, रयत शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी कर्मवीर अण्णांनी अनन्यसाधारण कष्ट घेतले. आज जवळपास साडेचार लाख विद्यार्थी व पंधरा हजार शिक्षक व शिक्षकेतर सेवक संस्थेत काम करत आहेत. कर्मवीर अण्णांनी शिक्षण कार्याची सुरुवात करताना वसतिगृहाची संकल्पना प्रथमत: सुरु केली. गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण द्यायचे असेल तर त्यांची राहण्याची सोय व्हावी हा त्या पाठीमागील उद्देश होता. कर्मवीर भाऊराव यांची ‘कमवा व शिका’ ही योजना एक दैवी शक्ती होती. ही पद्धत जर नसती तर अनेक विद्यार्थी शिक्षणाला मुकले असते. सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी जवळपास २०० तोळे सोने अण्णांच्या शैक्षणिक कार्याला अर्पण केले. शिक्षणाची दारे खुली होणार नाही तोपर्यंत ग्रामीण भागाचा विकास होणार नाही, असे मानणारे कर्मवीर होते. रयत शिक्षण संस्था ही सर्वसामान्य बहुजनांना शिक्षण देणारी संस्था आहे. या संस्थेतून प्रोफेशनल व स्पर्धात्मक शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यावर भर असेल. शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झालेली आहे. स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी अद्ययावत कौशल्ये आत्मसात करावीत. कर्मवीरांचा त्याग डोळ्यासमोर ठेवून काहीतरी करण्याचा उद्देश सर्वांनी ठेवावा. विद्यार्थ्यांनी कॉलेजचे शिक्षण घेतानाच अंतिम ध्येय निश्चित केले पाहिजे. अनेकांचे कॉलेज संपेपर्यंत काहीही ध्येय नसते. ध्येय निश्चित केले तरच ते साध्य होत असते. रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखा स्थापन करण्यामध्ये कर्मवीर आण्णांसोबत ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतलेे त्यांचा आज रयत संकुल कर्जतच्या वतीने सन्मान केला ही महत्त्वाची बाब असल्याचे सचिव विकास देशमुख त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनरल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, रयतच्या कर्जत-संकुलामध्ये ज्यांनी ज्यांनी शिक्षण घेतले त्यातील अनेक विद्यार्थ्यांनी आज आपले नाव देशपातळीवरती चमकवलेले आहे. दादा पाटील यांच्या संकल्पनेतून व कर्मवीर अण्णांच्या मार्गदर्शनातून उत्तर विभागातील पहिले हायस्कूल कर्जतला महात्मा गांधी यांच्या नावाने सुरु झाले. दीन दलितांच्या, वंचितांच्या पोरांना शिकवणारा हा जिताजागता देव आहे अशी उपाधी गाडगे महाराजांनी कर्मवीरांना दिलेली होती. विद्यार्थ्यांनी कर्मवीरांचे जीवन चरित्र समजून घेणे गरजेचे आहे. नवीन शैक्षणिक धोरण घातक आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांना फाटा देणारे आहे. आज समाजामध्ये जातीय, धार्मिक तेढ निर्माण केले जाते आहे. सर्व जातीधर्मीयांना घेऊन कर्मवीर भाऊरावांनी जो शैक्षणिक व समाजिकतेचा आदर्श पायंडा तयार केलेला होता, तो आज अंगीकारणे खूप गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
कर्जतच्या रयत संकुलामध्ये सुवर्णअक्षरांनी नोंद करावी अशा योगदान दिलेल्या महनीय व्यक्तींच्या कुटुंबियातील सदस्यांचा सन्मान रयत संकुलामार्फत करण्यात आला. यामध्ये राजेंद्रकाका निंबाळकर, राजेंद्रतात्या फाळके, बप्पाजी धांडे, अंबादासजी पिसाळ, किरण पाटील, कैलासराव शेवाळे, सुवालालजी छाजेड, सौ. सुवर्णाताई सोनमाळी, दादासाहेब थोरात, दीपकशेठ शिंदे, बाळासाहेब साळुंके, सुभाषचंद्र तनपुरे, भीमराव आप्पा नलवडे आदिंचा यावेळी सन्मान करण्यात आला.
रयत संकुल कर्जत मध्ये आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी सेवा केली, आपले बहुमोल योगदान दिले अशा रयत सेवकांचा सन्मान रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोर, प्राचार्य रामदासजी शेटे, प्राचार्य शिवदासजी दळवी, प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड, प्राचार्य डॉ. बाळ कांबळे, प्राचार्य डॉ. कुंडलिकराव शिंदे, प्राचार्य भानुदासजी नेटके, प्राचार्य दत्तात्रय बागल, प्राचार्य दामोदर अडसूळ, प्रा. अनंत जगदाळे, प्रा. सुभाष उगले, प्रा. भास्कर मोरे, अच्युत मोकाशी, सौ. सुषमा दादासाहेब बरबडे आदिंचा सन्मान करण्यात आला.
रयत संकुल कर्जतच्या वतीने ‘कर्मवीर जयंती सप्ताह’ निमित्त ज्या विविध शैक्षणिक स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या, त्या स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांचा सन्मानही रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील रयत संकुल कर्जतच्या तीनही शाखांच्या शैक्षणिक कामकाजाचे अहवाल वाचन, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार चौरे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी तर आभार सौ. सो. ना. सोनमाळी कन्या विद्यामंदिराच्या श्रीमती इर्शाद पठाण यांनी मानले.
या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. प्रकाश धांडे, प्रा. वसंत आरडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी व समन्वयकांनी केले. सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल म्हस्के व प्रा. राम काळे यांनी केले.