विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा १२ वर्धापन दिन प्रभाग क्रमांक ८ शिक्षक कॉलनी येथे मोठ्या उत्साहात साजरा

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत येथील प्रभाग क्रमांक ८ मधील शिक्षक कॉलनीमध्ये श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिराच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी सायंकाळी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वर्धापनदिनानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त भागवताचार्य हभप योगेशजी महाराज खंडके शास्त्री यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. हभप प्रवीण महाराज पठाडे यांनी त्यांना मृदंग साथ दिली. खंडके महाराज यांनी विविध उदाहरण, दाखल्यांसह समाजप्रबोधनपर कीर्तनसेवा केली. कीर्तन संपल्यानंतर महाप्रसादासह विविध धार्मिक घेण्यात आले.
यामध्ये टाळकरी, विणेकरी, प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांसह कर्जत शहरातील नागरिकांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नोकरदार, महिला व युवकांनी पुढाकार घेतला असल्याची माहिती नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल यांनी दिली.