

कर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात प्रिंट व सोशल मीडियावर भूमिका मांडणारे भाजपचे अहिल्यानगर दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष सचिन सखाराम पोटरे यांनी गंभीर आरोप केला आहे. सोशल मीडियावरील “महाराष्ट्राला माहीत नसणारे आ. रोहित पवार…?” ही मालिका बंद करावी, आमदारांवरील तसेच त्यांच्या आई-वडिलांवरील टीका थांबवावी, यासाठी आपल्यावर दबाव आणला जात असल्याचा दावा सचिन पोटरे यांनी केला आहे.
पोटरे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि कर्जत पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे.

निवेदनानुसार, सुमारे दीड महिन्यापूर्वी सागर सुभाष गवसने ऊर्फ सागर मराठा याने पिंपरी-चिंचवड येथील वाकड पोलीस ठाण्यात पोटरे यांच्याविरुद्ध तक्रार करून पोलीस कारवाईचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यानंतर वकिलामार्फत कायदेशीर नोटीसही पाठविण्यात आल्याचे पोटरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.२४ वाजता कर्जत बाजारतळ येथे सहकाऱ्यांसोबत असताना आपल्या मोबाईलवर व्हॉट्सॲप कॉल आला. या कॉलमध्ये संबंधित व्यक्तीने २० लाख रुपयांची मागणी केल्याचा तसेच मुलगा पुण्यात असल्याचा उल्लेख करून धमकी दिल्याचा आरोप पोटरे यांनी केला आहे. या संभाषणासंदर्भातील कॉल रेकॉर्डिंग, व्हॉट्सॲप कॉलचे स्क्रीनशॉट तसेच वकिलामार्फत मिळालेल्या नोटिशीची प्रत पोलिसांकडे सादर केल्याचे निवेदनात नमूद आहे.

या प्रकरणात कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार व संबंधित पुरावे सादर करण्यात आले असून, गुन्हा दाखल झाल्याचा दावा पोटरे यांनी केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे सोशल मीडिया टीका, राजकीय दबाव, खंडणीची मागणी आणि धमकी यांचा मुद्दा कर्जतच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. पोटरे यांनी स्वतःसह आपल्या कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.



