श्री जगदंबा विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न.


राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी :
‘कमवा आणि शिका’ या क्रांतिकारी सूत्राद्वारे बहुजन आणि ग्रामीण समाजातील घराघरांत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) हे आधुनिक भारताचे खरे शैक्षणिक शिल्पकार आहेत, असे गौरव उद्गार प्रमुख वक्ते प्रा. अजित खरसडे (श्रीगोंदा) यांनी काढले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंती सोहळ्याचे आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना प्रा. खरसडे यांनी कर्मवीरांच्या त्याग, निष्ठा आणि दूरदृष्टीच्या आठवणींना उजाळा दिला. “अण्णांनी शून्यातून विश्व निर्माण करत गरिबांच्या मुलांच्या हाती पाटी-पेन्सिल दिली. ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हे केवळ वाक्य नसून, ती स्वाभिमानाने जगण्याची किमया आहे. अण्णांनी लावलेल्या या वटवृक्षाच्या सावलीत आज लाखो विद्यार्थी घडत असून, त्यांच्या विचारांचा वसा जपणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहूराजे राजेभोसले होते. या प्रसंगी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, उद्योजक मेघराज बजाज, बापू सुखदेव धोंडे, उद्योजक रामदास सलगर, भास्कर मोढळे, बिभीषण जंजिरे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी बोलताना पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड म्हणाले, “शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्त, संस्कार आणि सामाजिक जबाबदारीचे भान जपले पाहिजे. कर्मवीरांच्या संस्कारातून घडलेली पिढीच देशाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकते.” उद्योजक रामदास सलगर व भास्कर मोढळे यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा पाठीवर थाप देऊन गौरव
शैक्षणिक वर्षभरात क्रीडा, सांस्कृतिक, बौद्धिक व विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन विशेष गौरव करण्यात आला. बक्षीस मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तेज फुलले होते.
ग्रामस्थ व रयत सेवकांची मोठी उपस्थिती
या सोहळ्यास स्थानिक स्कूल कमिटीचे रामकिसन साळवे, ज्ञानेश्वर (माऊली) सायकर, विक्रम राजेभोसले, अशोक जंजिरे, दादासाहेब परदेशी, मालोजीराजे भिताडे, एम. डी. कानगुडे, मधुकर दंडे यांच्यासह माजी रयत सेवक नेटके, खंडागळे, कानगुडे, सय्यद, झगडे, सोनवणे, शेटे, साळवे, रुद्र दादा राऊत, अंबादास गव्हाणे, अंकुश साळवे, विजय साळवे, घायाळ काका आणि परिसरातील शिक्षणप्रेमी, पालक, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमप्रसंगी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश उढाणे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे निओजित व बहारदार सूत्रसंचालन भगवान शिंदे व सौ. पल्लवी घोडके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार किशोर करपे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



