दैनिक लोकपरिवर्तनच्या वतीने प्राचार्य राजेंद्र नष्टे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव.

राशिन( प्रतिनिधी) जावेद काझी : – शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व अविरत योगदान देणारे राशीन येथील राजेंद्र नष्टे यांना ‘दैनिक लोकपरिवर्तन’च्या वतीने नुकतेच राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अहिल्यानगर येथील आयुर्वेद कॉलेजसमोरील नाथकृपा सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

आमदार संग्रामभैया जगताप, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार काशीनाथ दाते आणि आमदार अक्षयदादा कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दैनिक लोकपरिवर्तनचे संपादक आबासाहेब शिरसाठ व अशोक सूर्यवंशी यांच्या हस्ते राजेंद्र नष्टे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विद्यार्थी विकासासाठी सातत्यपूर्ण कार्य
शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य करत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी नष्टे यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यांच्या याच निष्ठेची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय बहुमान देण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे राशीन शहर व परिसरात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संस्कार आणि अभ्यासू वृत्तीचा वारसा

आपल्या यशाविषयी बोलताना राजेंद्र नष्टे भावूक झाले. ते म्हणाले, “माझे वडील कै. नारायण गंगाधर नष्टे आणि आई कै. ताराबाई नष्टे दोघेही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक होते. स्वभाव प्रेमळ व संयमी असला तरी मुलांचा अभ्यास घेताना ते अत्यंत कडक शिस्तीचे होते. शिक्षणात कोणतीही तडजोड नाही या मतावर ते ठाम होते. त्यांच्या याच अभ्यासू दृष्टीमुळे आम्ही सर्व भावंडे — मी, भाऊ दिलीप दादा, गंगाधर (संजू) आणि बहीण रंजना — उच्चशिक्षित होऊन स्वतःच्या पायावर उभे राहू शकलो. आज मिळालेला हा सन्मान म्हणजे माझ्या आई-वडिलांच्या संस्कारांचीच पावती आहे.”
सर्वस्तरातून कौतुक व शुभेच्छा
राजेंद्र नष्टे यांच्या या यशाबद्दल समाज विकास संस्थेचे अध्यक्ष अल्लाउद्दीन एस. काझी, सचिव दिलीप नष्टे, वासुदेव फर्निचरचे संचालक मेघराज ऊर्फ आप्पुशेठ बजाज व प्रकाश शेठ बजाज, शिवाजीराव सुरवसे, अविनाश दोशी तसेच डॉक्टर व मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
याशिवाय, राशीन येथील श्री जगदंबा विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी, हशु आडवाणी विद्यालयाचा कर्मचारी वर्ग आणि जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेतील शिक्षकवृंदानेही नष्टे यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




