राशीन जि.प.शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विजय साळवे तर उपाध्यक्षपदी निलेश चव्हाण यांची वर्णी.


राशीन प्रतिनिधी जावेद काझी.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राशीन मुले येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठनासाठी आयोजित पालक मेळाव्यात विजयकुमार साळवे यांची अध्यक्षपदी, तर निलेश चव्हाण यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. पालकांच्या उत्स्फूर्त सहभागात पार पडलेल्या या निवडीने शाळा व्यवस्थापन समितीला नवी नेतृत्वाची दिशा मिळाली आहे.
शासनाच्या नवीन धोरणानुसार शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यासाठी या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती उज्वला गायकवाड उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित पालकांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक अशोक नेवसे यांनी शाळा व्यवस्थापन समितीची जबाबदारी व कर्तव्ये तसेच निवड प्रक्रियेचे निकष याबाबत शासन आदेशाचे वाचन करून माहिती दिली.

त्यानंतर निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रत्येक वर्गातून आरक्षणानुसार पुरुष व महिला सदस्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पालकांमधून एकूण १६ सदस्य निवडण्यात आले. त्यानंतर शिक्षणप्रेमी सदस्य म्हणून माजी विद्यार्थी निलेश पवार यांची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदाची माळ विजयकुमार साळवेंच्या गळ्यात!
शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदासाठी विजयकुमार साळवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर निलेश चव्हाण यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीने शाळेच्या आगामी विकासकामांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

पालक प्रतिनिधी म्हणून सुरेखा आढाव, सुशीला गंगावणे, रोहित साळवे, सचिन आढाव, किरण उकिरडे, सपना साळवे, सागर मासाळ, उमेश पंडित, रेशमा लष्करे, तब्बसूम बेग, वसीम तांबोळी, मनीषा जाधव, प्रतीक्षा कांबळे व नागेश्वर मरकाम यांची निवड करण्यात आली. उज्वला पंडित शिक्षक प्रतिनिधी, तर मुख्याध्यापक अशोक नेवसे सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
निवडीनंतर नूतन अध्यक्ष विजयकुमार साळवे व उपाध्यक्ष निलेश चव्हाण यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी निलेश पवार,सचिन साळवे, श्रीकांत साळवे, अमोल आढाव, श्रीकांत साळवे, निलेश जांभळकर व अमोल पंडित यांच्यासह पालक उपस्थित होते. तसेच मुलांच्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अतुल साळवे आणि मुलींच्या शाळेचे अध्यक्ष अमोल जाधव उपस्थित होते.
“शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला आणि मूलभूत सुविधांना प्राधान्य देणार,” असा विश्वास नूतन अध्यक्ष विजयकुमार साळवे यांनी व्यक्त केला.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात निवड प्रक्रिया पार पडली. महिला शिक्षकांनी साकारलेल्या आकर्षक रांगोळीने पालक मेळाव्याची शोभा वाढली. कार्यक्रमासाठी सहशिक्षक राजीव राठोड व भास्कर घोडके यांचे सहकार्य लाभले. शेवटी प्रदीप कोकाटे यांनी आभार प्रदर्शन केले.



