राशीन येथे ‘प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान’ संपन्न.


राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवार (दि. ९) रोजी ‘प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियाना’अंतर्गत गरोदर मातांची विशेष आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. सकाळी १० वाजेपासून सुरू झालेल्या या शिबिरात परिसरातील अनेक गरोदर मातांची सखोल तपासणी करण्यात आली असून, २१ मातांना धनुर्वात प्रतिबंधक (टीटी) इंजेक्शन देण्यात आले.
या प्रसंगी श्रीमती व्ही. एस. गायकवाड, श्रीमती कांबळे, श्रीमती ननवरे, श्रीमती पवार, श्रीमती सोनटक्के, श्री. अल्पेश कुचेकर यांच्यासह परिसरातील सर्व ‘आशा’ सेविका उपस्थित होत्या.
“प्राथमिक आरोग्य केंद्र, राशीन येथे वर्षभरातील बाराही महिने दर महिन्याच्या ९ तारखेला गरोदर मातांची मोफत तपासणी केली जाते. राशीन व परिसरातील सर्व गरोदर मातांनी या शासकीय सुविधेचा व आरोग्य तपासणीचा अधिकाधिक लाभ घ्यावा.”असे आवाहन
— डॉ. दिलीप व्हरकटे (वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र, राशीन) यांनी केले आहे.

चार कोटींच्या निधीतून साकारली सुसज्ज इमारत
दरम्यान, राशीन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नूतन इमारत व परिसर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी उपलब्ध करून दिलेल्या सुमारे चार कोटी रुपयांच्या निधीतून ही भव्य वास्तू उभारण्यात आली आहे.
आधुनिक सुविधा: इमारतीमध्ये विविध आरोग्य तपासण्यांसाठी स्वतंत्र, सुसज्ज आणि स्वच्छतापूर्ण कक्ष उभारण्यात आले आहेत.
निसर्गरम्य परिसर: आरोग्य केंद्राच्या आवारात लावलेली झाडे आणि त्यांचे केलेले उत्कृष्ट संगोपन यामुळे येथे आल्हाददायक व निरोगी वातावरण निर्माण झाले आहे.

कर्मचारी निवासस्थाने: संपूर्ण वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आवारातच सुसज्ज निवासस्थाने बांधण्यात आली आहेत.
उत्कृष्ट बांधकाम, स्वच्छता आणि निसर्गरम्य परिसर यामुळे ही इमारत राशीन शहराच्या वैभवात भर घालत असून, रुग्णसेवेसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.



