मिरजगाव येथील जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये कृष्णजन्माष्टमी मोठा उत्साह!

(कर्जत प्रतिनिधी): – मिरजगाव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. मिरजगाव जिजाऊ इंग्लिश स्कूल येथे जन्माष्टमीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिजाऊ इंग्लिश स्कूल येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमांना विद्यार्थी, शिक्षक आणि परिसरातील पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या आयोजित दहीहंडी महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशव शिंदे हे होते. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय सण आणि संस्कृतीचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संस्थेचे सचिव क्रिष केशव शिंदे आणि संस्थेच्या सल्लागार शर्मिला केशव शिंदे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
चिमुकल्या गोविंदांनी रचले थरावर थर

उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे लहान मुलांनी परिधान केलेले राधा आणि कृष्णाचे मनमोहक पेहराव होते. ‘गोविंदा रे गोपाळा’ च्या जयघोषात आणि संगीताच्या तालावर चिमुकल्या बालगोपाळांनी थरावर थर रचून दहीहंडी फोडली. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील बहुसंख्य पालक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
शिक्षक व कर्मचाऱ्यांचे नेटके नियोजन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सहशिक्षिका सरिता काळाने, सुरेखा शेलार, निकिता माळवदे, अपेक्षा लिमकर, प्रियदर्शनी मुंगीकर, अनिता ननवरे, तृप्ती शिंदे आणि आशा पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच दत्ता सकट, सूर्यकांत सकट यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे चोख नियोजन केले होते. मिरजगाव परिसरातील हा उत्सव शिस्तबद्धता आणि बालचमूंच्या उत्साहामुळे नागरिकांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला…




