नगराध्यक्षा घुले व गटनेते मेहेत्रे यांना उच्च न्यायालयाचा दणका; अविश्वास ठरावाची विशेष सभा १० दिवसांत घेण्याचे आदेश

कर्जत | प्रतिनिधी : कर्जत नगरपंचायतीतील राजकीय घडामोडींना निर्णायक वळण देणारा महत्त्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. नगराध्यक्षा रोहिणी घुले आणि गटनेते संतोष मेहेत्रे यांनी दाखल केलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावत, नगराध्यक्षांविरुद्धच्या अविश्वास ठरावासाठी रखडलेली विशेष सभा १० दिवसांच्या आत घेण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत…
न्यायमूर्ती किशोर संत आणि न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय देताना लोकशाही प्रक्रियेला प्राधान्य दिले. “लोकशाहीत बहुमताला सर्वोच्च महत्त्व असून, बहुमताने गटनेता बदलण्याची प्रक्रिया पूर्णतः कायदेशीर आहे,” असे न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवले.
तसेच, गटनेता बदल आणि विशेष सभा बोलावण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. या प्रकरणात यापूर्वी देण्यात आलेले सर्व अंतरिम आदेशही न्यायालयाने रद्द केले आहेत…
या निकालामुळे कर्जत नगरपंचायतीतील राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसला असून, स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आता महाराष्ट्र नगरपंचायत अधिनियमातील तरतुदींनुसार अविश्वास ठरावाची विशेष सभा पुढील १० दिवसांत पार पडणार आहे. त्यामुळे नगराध्यक्षांच्या भवितव्याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता असून, कर्जतच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत.




