कर्जत पोलिसांची धडक कारवाई! ३ लाखांच्या ठिबक पाईप चोरीचा पर्दाफाश; ३ आरोपी जेरबंद, १९.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त


कर्जत | प्रतिनिधी :- कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील शिवसम्राट हॉटेलजवळून टाटा ४०७ वाहनातील सुमारे ३ लाख रुपयांचे ठिबक सिंचन पाईप चोरून नेणाऱ्या टोळीचा कर्जत पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीचा माल, गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने असा एकूण १९ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारनेर तालुक्यातील आळकुटी येथील प्रकाश किसन वाघुले यांच्या मालकीच्या टाटा ४०७ वाहनामध्ये १६ व २० एमएमचे ठिबक सिंचनाचे २४२ बंडल ठेवण्यात आले होते. ७ जून रोजी अज्ञात चोरट्यांनी हा माल लंपास केला होता. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना कर्जत पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजची सखोल छाननी केली. तपासादरम्यान या चोरीमागे सहा जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी ऋतुराज रणजित सोनवणे (रा. सणसर, ता. इंदापूर), अमोल तान्हाजी साळुंखे (रा. अकलूज, ता. माळशिरस) आणि आकाश अशोक हदिमनी (रा. कन्हेरगाव, ता. माढा) यांना अटक करण्यात आली.

तर जनार्धन विलास लोखंडे, अक्षय किसन सोनवणे आणि विठ्ठू शिंदे हे आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी २ लाख ४६ हजार रुपयांचे १२२ ठिबक पाईप बंडल, ६ लाख रुपयांची सुझुकी फ्रॉन्स कार आणि १० लाख रुपयांचा आयशर टेम्पो जप्त केला आहे. अशा प्रकारे एकूण १९ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
फरार आरोपींचा तसेच चोरीला गेलेल्या उर्वरित मालाचा शोध सुरू असून पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत.

पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमीझ मुल्लाणी, संदीप वसावे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मुळीक, महिला पोलीस हवालदार मिनाक्षी कांबळे, तसेच पोलीस कर्मचारी प्रताप देवकाते, विशाल शिरसागर, प्रकाश दंडाडे, अमोल रायकर, किरण बोऱ्हाडे, किरण जाधव, सचिन थोरात, नानासाहेब वाघमारे, वैभव गांगर्डे आणि मोबाईल सेलचे राहुल गुंड, अरुण सांगळे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली…

