दत्तकला शिक्षण संस्थेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना ६ वह्या व ५ पेन संच भेट; माळंगी ग्रामस्थांचा उपक्रमाला उत्स्फूर्त सहभाग


कर्जत, प्रतिनिधी : – शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ सर यांच्या वतीने माळंगी येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यास सहा वह्या आणि पाच पेनचा संच देण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी मिळालेल्या साहित्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

साहित्य वाटप कार्यक्रमासाठी माळंगीची सेवेकरी टीम तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवेकरी टीमच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी माळंगी गावातील ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याचेही विशेष कौतुक करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती करून गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरत आहे.

माळंगीची सेवेकरी टीम तसेच गावातील सर्व ग्रामस्थांचे या स्तुत्य उपक्रमाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

